नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी शहरी भागात कल्पक उपक्रम राबवावे आणि ग्रामीण भागातही शिबिरांचे आयोजन अधिक प्रमाणात करावे , असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले.
दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपविभागीय अधिकारी महेश शेलार, चेतन गिरासे, शाहूराज मोरे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आदी उपस्थित होते.
डॉ.भारुड म्हणाले, 1 जूनपासून दुकानांच्या संदर्भातील निर्बंध शिथील केल्यानंतर गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. 45 वर्षावरील दुकानदार आणि फेरीवाल्यांचे लसीकरण त्वरीत करण्यात यावे. लसीकरणा शिवाय आस्थापना सुरू करण्याची अनुमती देऊ नये. ग्रामीण भागात गावनिहाय याद्या तयार करून लाभार्थ्यांचे लसीकरण करून घ्यावे. लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना आवश्यक सुविधा द्याव्यात. जनजागृतीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावे.
गावातील मंडळनिहाय सरपंच, मुख्याध्यापक, तलाठी, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्या बैठका घ्याव्यात. जनजागृतीच्या कामात गावातील युवकांचा सहभाग घ्यावा. शहरात कमी लसीकरण झालेल्या भागात स्वयंसेवी संस्था, त्या भागातील लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घ्यावी. ग्रामीण भागात बचत गटाच्या महिलांचे सहकार्य घेण्यात यावे.
कोरोना बाधित आढळणाऱ्या गावात मोहिम स्तरावर कोरोना चाचण्या कराव्यात. कोरोना बाधितांची संख्या कमी होत असताना चाचण्यांची संख्या कमी होणार नाही याची दक्षता घ्यावी. मनरेगाच्या माध्यमातून अपूर्ण कामे मोहिम स्तरावर पूर्ण करण्यात यावीत, असे त्यांनी सांगितले.
बैठकीस तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, मुख्याधिकारी उपस्थित होते.