नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कृषि विभागामार्फत अन्नधान्य व फलोत्पादन पिकांच्या मूल्य साखळी विकासाच्या उपप्रकल्पांसाठी माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील समुदाय आधारित संस्था व संस्थात्मक खरेदीदार यांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले आहे.
सदर प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात यापूर्वी 7 समुदाय आधारित संस्थांना राज्यस्तरावरून प्राथमिक मान्यता देण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यासाठी 15 समुदाय आधारित संस्थांच्या मंजुरीचा लक्षांक निश्चित करण्यात आला असून नवीन प्रकल्पांना मंजुरीसाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी (FPO/ FPC) यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्यासाठी पात्र समुदाय आधारित संस्थांमध्ये प्रकल्पाच्या प्राथमिक अटी पूर्ण करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन यांचा समावेश आहे. प्राप्त अर्जांपैकी स्पर्धात्मक व उत्कृष्ट अर्जांना प्रकल्पाचे मंजूर समुदाय आधारित संस्थांना मंजूर प्रकल्प आराखड्याच्या किंमतीनुसार अन्नधान्य पिकांसाठी 60 टक्के अनुदान दराने 2 कोटी तर फलोत्पादन पिकांसाठी 60 टक्के अनुदान दराने 3 कोटी इतके अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
अर्ज सादर करण्यासाठी पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना याबाबतची माहिती https://www.smart-mh.org या संकतेस्थळावर व ‘आत्मा’ च्या नंदुरबार कार्यालयात उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्ह्याचे नोडल अधिकारी प्रदीप लाटे (9420408041) किंवा पुरवठासाखळी व मुल्यसाखळी तंज्ञ (9403383524 ) यांच्याशी संपर्क साधावा किंवा जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधुन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.