नंदुरबार (प्रतिनिधी) :- शहादा येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने थेट शेत बांधावर जाऊन पिकावरील रोग टाळण्यासाठी पिवळे स्टिकी कार्ड व निळे स्टीकी कार्ड किती उपयुक्त आहेत याबाबत माहिती दिली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत के. व्ही. पटेल कॉलेज ऑफ़ अँग्रीकलचर, शहादा येथे अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेले दिनेश ठाकरे यांनी आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना टरबुज पिकावरील किटक रोखण्यासाठी पिवळे स्टिकी कार्ड व निळे स्टीकी कार्ड वापर करणे किती सोईचे आहे, हे पटवून सांगितले. आजकाल शेतातील पिकांवर किटकांचा प्रादुर्भाव खुप वाढत चालला आहे. त्यामुळे शेतकर्यांना रासायनिक औषधांचा व खतांचा वापर करावा लागतो. अनेक वेळा त्यासाठीचा खर्च न परवडणारा असतो. त्यासाठी अत्यंत कमी खर्चात उपलब्ध होणारे पिवळे स्टिकी कार्ड व निळे स्टीकी कार्ड हा एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. हे एक आधुनिक तंत्रज्ञान आहे. पिवळे स्टिकी कार्ड व निळे स्टीकी कार्ड शेतात लावल्यावर त्यात मावा, थ्रीप्स, तुडतुडे, पांढऱ्या माश्या व इतर लहान कीटक त्यास चिटकले जातात.
त्यामुळे किटकांची संख्या वाढत नाही. याबाबत दिनेश ठाकरे याने थेट शेतकऱ्यांना शेतात जाऊन माहिती दिली. याबाबतचे प्रात्यक्षिकही करून दाखविले. यावेळी त्यांच्या सोबत विलास माळी, रुपेश माळी, योगेश पेंढारे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. कृषी विद्यालयाचे प्रा. कृणाल पाटील व इतर प्राध्यापकांचे त्याला याकामी मार्गदर्शन मिळाले. अत्यंत उपयुक्त अशी माहिती थेट शेतात येऊन समजावून सांगितली, म्हणून शेतकऱ्यांनी त्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.