नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे अक्कलकुवा तालुक्यात वालंबा गावातील मोग्या गाया पाडवी यांचे 80 हजाराचे कर्ज माफ झाले असून डोंगराळ भागात ट्रॅक्टरच्या सहाय्याने आधुनिक तंत्र वापरण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील डोंगराळ भागात वालंबा हे गाव आहे. गावातील वस्ती डोंगरांवर विखुरलेली आहे. शेती करणे अत्यंत कष्टाचे काम तर आहेच शिवाय बहुतांशी निसर्गावर अवलंबून रहावे लागते. दुर्गम भाग असल्याने पारंपरिक शेतीला मर्यादा येतात. अशात निसर्गाची अवकृपा झाली तर पुढच्या वर्षी कर्ज काढण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.
वालंबा गावातील मोग्या गाया पाडवी यांनादेखील निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसला. दोन वर्षापूर्वी हातात आलेले उत्पन्न गेले आणि त्यांना 80 हजाराचे कर्ज फेडता आले नाही. त्यामुळे इच्छा असूनही त्यांना शेतीत नवे तंत्र वापरता येत नव्हते. महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे आता मात्र ते शक्य झाले आहे.
मोग्या पाडवी आपल्या 7 एकर जमिनीवर मका, भगर, हरबरा, गहू अशी पिके घेतात. सतत तीन वर्षापासून शेतीतून काहीच उत्पन्न मिळाले नव्हते. हंगामी पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ते कर्जबाजारी झाले. शेतीतील मर्यादीत उत्पन्नात कर्ज फेडणे शक्य नव्हते. दुर्गम भागात शेती करणे अवघड असल्याने त्यांना ट्रॅक्टर घेण्याची इच्छा होती. पण शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी शेतकऱ्याच्या हिश्श्याची रक्कम भरणे त्यांना शक्य नव्हते.
शेतकरी कर्जमुक्ती योजनेची झाल्याने पाडवी यांच्या मनात पुन्हा एकदा ट्रॅक्टर खरेदीचे विचार येऊ लागले. आधार प्रमाणिकरण झाल्यावर त्यांच्या नावाचे 80 हजाराचे कर्ज शून्यावर आले. आता त्यांनी ऑनलाईन नोंदणीत ट्रॅक्टर खरेदसाठी अर्ज सादर केला आहे. शेतात लवकरच ट्रॅक्टर फिरेल आणि आधुनिक पद्धतीने शेती करता येईल अशी त्यांना आशा आहे. त्यांनी स्ट्रॉबेरीसारखे पीक घेण्याचीदेखील तयारी सुरू केली आहे. त्यांच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांना कर्जमुक्तीमुळे शेतीच्या नव्या वाटा गवसल्या आहेत.
मोग्या पाडवी- काही वेळा शेतातून काहीच मिळत नाही. तीन वर्षे पीकांचे नुकसान झाल्याने कर्ज वाढले. कर्जमुक्तीचा आनंद आहे. डोंगराळ भाग असल्याने ट्रॅक्टर गरजेचा आहे. कर्जमुक्तीमुळे आता दीड लाखाचा हिस्सा भरता येईल.