नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार असून या पुस्कारासाठी जिल्ह्यातील गणेश मंडळांनी प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी केले आहे.
या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीस स्टेशन यांची किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल.
यासाठी खालील निकषाच्या आधारे पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल पर्यावरणपुरक मुर्ती, पर्यावरणपुरक सजावट,(थर्माकाल, प्लॅस्टीक इत्यादी साहित्य विरहीत) ध्वनी प्रदुषण रहित वातावरण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्वा निर्मुलन, सामाजिक सलोखा, समाज प्रबोधन देखावा, सजावट, स्वांतत्र्याच्या चळवळीसंदर्भातील देखावा/ सजावट, रक्तदान शिबीर, वैद्यकीय सेवा शिबिर इत्यादी कार्य. शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिंनी यांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक इत्यादीबाबत केलेले कार्य, महिला, ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक इत्यादीबाबत कार्य, पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, पांरपारिक देशी खेळाच्या स्पर्धा, गणेश भक्तासाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा आदी निकषानुसार गुणांकावर पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल.
गणेशोत्सव मंडळाने करावयाच्या अर्जाचा नमुना www.maharashtra.gov.in पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांचे संकेत स्थळ www.pideshandekalaacademy.org व दर्शनिका विभागाचे संकेत स्थळ https://mahagazetteers.com वर उपलब्ध आहे. अर्जासाठी व सहभागासाठी कोणतेही शुल्क नाही. सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळाने सदर अर्ज भरुन [email protected] या ईमेलवर ३० ऑगस्ट, २०२२ पूर्वी पाठवावेत.
विजेत्यांची निवड जिल्हास्तरीय समितीमार्फत करण्यात येईल. राज्यातील पहिल्या तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळाना शासनाकडून प्रथम क्रमांक 5 लाख, द्वितीय क्रमांक 2 लाख 50 हजार तर तृतीय क्रमांकास 1 लाखाचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येईल.
तरी नंदुरबार जिल्ह्यातील जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांनी या पुस्कारासाठी आपले प्रस्ताव सादर करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी केले आहे.