नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि पिरामल स्वास्थ्यच्या संयुक्त विद्यमाने अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यासाठी आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत निती आयोगाच्या आरोग्य निर्देशांकात सुधारणा करण्याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
पिरामल स्वास्थ्यच्या राज्य व्यवस्थापक रंजना पांडे यांनी माता मृत्यूदर कमी करणे, बालक आणि गरोदर महिलांचे पोषण, आरोग्य सुविधांची गुणवत्ता याबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेला ग्रामीण भागातील प्रतिष्ठीत नागरिक, दुर्गम पाड्यातील कार्यशील महिला, समाज प्रेरक, आदिवासी युवक-युवती उपस्थित होते. दोन्ही तालुक्यांच्या 60 गावातील 80 प्रतिनिधी कार्यशाळेला उपस्थित होते.
गर्भवती मातेच्या नोंदणीचे महत्व, अतिसाराची कारणे आणि उपचार, संस्थात्मक प्रसूतीचे फायदे आणि स्तनपान या प्रमुख विषयावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आरोग्य विभागातील उपलब्ध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश पाडवी, अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालय मधील डॉ. ज्योती बालापूरे, धडगाव ग्रामीण रुग्णालय येथील डॉ. परमार, पिरामल स्वास्थ्यचे नंदुरबार प्रतिनिधी उपस्थित होते.