नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा अतिदुर्गम भागात स्ट्रॉबेरी लागवड करणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी पॅकेजिंगसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार असून त्याबाबत प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा यांनी स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
डाब व वालंबा परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळण्यासाठी स्ट्रॉबेरीचे पॅकेजिंग आवश्यक आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी याच्या सूचनेनुसार न्युक्लीअस बजेट योजनेअंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी पॅकेजिंगसाठी अर्थसहाय्य देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार तळोदा प्रकल्पाने पॅकेजिकसाठी अर्थसहाय्य देण्याची योजना तयार केली. त्यानुसार 28 शेतकऱ्यांना पॅकेजिंगसाठी 85 टक्के अनुदानाची रुपये 12 हजार 750 इतकी रक्कम प्रत्येक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य म्हणून देण्यात येणार आहे.
श्री. पंडा यांनी दाब परिसरात भेट दिली . त्यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांसोबत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जावून स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना योजनेची माहिती दिली. याप्रसंगी परिसरातील शेतकरी सहायक प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर व कृषी विभागातील कर्मचारी उपस्थित होते.