नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) –  जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नंदुरबार आणि प्रकल्प संचालक आत्मा कार्यालयाच्यावतीने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या शेतकरी प्रशिक्षण सभागृहात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवाचे उद्घाटन आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार शिरीषकुमार नाईक, नवापूर पंचायत समिती सभापती रतिलाल कोकणी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एन.बी.भागेश्वर आदी उपस्थित होते.

            रानभाज्या योग्य ब्रँडींग आणि मार्केटींग करून शहरी भागात पोहोचविण्याची आवश्यकता असल्याचे डॉ.गावीत यांनी यावेळी सांगितले.

            रानभाज्या महोत्सवाचा उपक्रम स्तुत्य असून या उपक्रमात सातत्य ठेवावे आणि अधिकाधीक नागरिकांपर्यंत या भाज्यांचे महत्व पोहोचवावे असे श्री.नाईक यांनी सांगितले.

            कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता एस.बी. खरबडे, विभागीय विस्तार केंद्र प्रमुख एम. एस. महाजन उद्यान विद्या विभागाचे प्रा. श्रीधर देसले  यांनी रानभाज्यांविषयी माहिती दिली.

महोत्सवात नवापूर व नंदुरबार तालुका व स्थानिक परिसरातील कपाळ फोडी , भुई आवळा, साय फळ, रक्त रोडा, पाथरी, नाळी भाजी,  कर्टोले, कोंबडा,  वाया,  डोहली फुले, आघाडा, तरोटा भाजी, डोमली, चुचा भाजी, डोड सिरा भाजी, उखरडा भाजी, लायकोट,  झील भाजी, फांग भाजी, लाल/पांढरी अंबाडी, तोंडली, माठला भाजी, रांनभोपला, रान अळूचे पान, मायाळू,  घाटकोळ, तांदुळजा, बांबूचे कोंब, भोकर, कुहडी, केना, शतावरी, रान केली, तेरा भाजी आदी रानभाज्यांचा समावेश होता.

जिल्ह्यातील इतर तालुक्यातही रानभाज्या महोत्सव साजरा करण्यात आला. कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी नंदुरबार दौऱ्यादरम्यान आदिवासी दिनानिमित्त 9 ऑगस्ट रोजी राज्यभरात रानभाज्या महोत्सव आयोजित करण्याची घोषणा केली होती. रानभाज्यांचे महत्व शहरी भागात पोहोचावे आणि आदिवासी बांधवांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.