नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात 28 एप्रिल ते 2 मे 2021 या कालावधीत वादळीवारा, वीजा व गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली असून या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी कळविले आहे.
शेतकऱ्यांनी शेतमाल व काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी झाकुन ठेवावीत. वादळी वाऱ्यापासून संरक्षणासाठी भाजीपाला, मिरची, पपई, केळी, इ. पिकांना आधार देण्याची व्यवस्था करावी, पक्वता अवस्थेत असलेल्या पिकाची काढणी करुन सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावी. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही अशी काळजी घ्यावी. वीजेपासून व गारांपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळे मैदान, झाडाखाली, वीजवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मरजवळ थांबू नये.
सर्व नागरिकांनी वादळी वारे, वीजा आणि गारपीटीपासून स्वत:सह गुरा-ढोरांचे संरक्षण होईल याची काळजी घ्यावी असे आवाहन आले आहे.