नंदुरबार : जिल्ह्यात पावसाळ्यापूर्वीची अत्यावश्यक कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निदे्रश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य व प्रमुख महामार्गाची कामे आणि दुरुस्ती करणे, जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगर परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था यांचे कार्यक्षेत्रांतर्गत रस्ते, मलनि:स्सारणाची कामे, सांडपाणी व्यवस्थापन, ग्रामीण रस्ते तसेच पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत रस्त्यांच्या कामांचा यात समावेश आहे. या संदर्भात पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्याची कामेदेखील वेळेत करण्याचे आदेशीत करण्यात आले आहे.
महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम आणि इतर विद्युत विषयक कामे व दुरुस्ती, बीएसएनएल आणि इतर दूरसंचार कंपन्यांकडील दूरसंचार आणि इंटरनेट सेवा संचालन, लाईन दुरुस्ती आदी कामे पूर्ण करावीत. त्याबाबत खाजगी संस्थांना कामे पूर्ण करण्याबाबत बीएसएनएलने लेखी आदेश द्यावेत. रेल्वे विभागाची पावसाळ्यापूर्वीची रेल्वे मार्गावरील करावयाची अत्यावश्यक कामे, तसेच स्टेश्न परिसरातील कामे, तसेच विविध विभागांची पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक असलेली कामे सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
बांधकामावरील मजूरांना बांधकामाचे ठिकाण सोडून इतरत्र फिरता येणार नाही, याची जबाबदारी साईट इंजिनिअर यांची असेल. राज्याच्या मुख्य सचिवांकडील 17 एप्रिल 2020 अन्वये अटी शर्तीच्या अधीन राहून ही कामे तात्काळ पूर्ण करावीत. संबंधित विभागाचे जिल्हास्तरीय प्रमुख अधिकाऱ्यांनी कर्मचारी व वाहने यांच्यासाठी त्यांच्यास्तरावरून आदेश काढावेत व त्याची एक प्रत पोलीस विभागाकडे द्यावी. कर्मचाऱ्यांना आदेशाची प्रत आणि ओळखपत्र जवळ बाळगण्याच्या सूचना देण्यात याव्यात , असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.