नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी व्यापक उपाययोजनांवर भर द्यावा आणि अतितीव्र बालकांचे पोषण आणि उपचाराकडे विशेष लक्ष देण्यात यावे, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कुपोषणाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी मनीषा खत्री, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, मैनक घोष, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, जिल्हा कार्यक्रम अधिकारी बी.एफ.राठोड, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आदी उपस्थित होते.
ॲड.पाडवी म्हणाले, कुपोषण कमी करण्यासाठी असलेल्या शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी अंगणवाडी स्तरापर्यंत सूक्ष्म नियोजन करावे. गर्भवती महिला आणि स्तनदा मातांच्या पोषणाकडेही विशेष लक्ष द्यावे. कुपोषित बालकाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतरही त्याच्या प्रकृतीकडे पुढील काही काळ सातत्याने लक्ष द्यावे.
बाल उपचार केंद्रात बालकांना दाखल करण्यासाठी पालकांचे समुपदेशन करण्यात यावे. बाल उपचार केंद्रासाठी आवश्यक निधी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल. बालकांवर योग्यरितीने उपचार करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना अधिक प्रशिक्षण देण्यात यावे. सामाजिक दृष्टिकोनातूनही या प्रश्नाचा विचार करावा लागेल, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात 1 लाख 11 हजार 857 बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून 2 हजार 616 अतितीव्र कुपोषित आणि 13 हजार 257 मध्यम कुपोषित बालके आढळली आहेत. कुपोषित बालकांवर उपचार करण्यासाठी 26 प्राथमिक आरोग्य केंद्रात बाल उपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीला जि. प.सदस्य सी.के.पाडवी, रवींद्र पाडवी, संगीता पावरा आणि महिला व बालविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
स्थानिक विकास निधी अंतर्गत रुग्णवाहिकांचे लोकार्पण
बैठकीपूर्वी पालकमंत्री ॲड.पाडवी यांच्या हस्ते 5 रुग्णवाहिका आणि 1 शववाहिकेचे लोकर्पण करण्यात आले. या रुग्णवाहिकांचा उपयोग अक्कलकुवा, जमाना, तोरणमाळ, धडगाव आणि मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयासाठी तर शववाहिकेचा उपयोग धडगाव-वडफळ्या नगरपंचायतीसाठी होणार आहे. या रुग्णवाहिकांसाठी ॲड.पाडवी यांच्या अक्कलकुवा मतदार संघाकरिता उपलब्ध निधीतून 68 लाख 46 हजार रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. एक आणखी रुग्णवाहिका खापर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. डोंगराळ भागातील नागरिकांना या रुग्णवाहिकांचा चांगला उपयोग होईल, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले.