अक्कलकुवा :- (प्रतिनिधी) कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बागलाण सेवा समिती, व तेरे देस होम्स फ्रान्स/जर्मनी यांच्या संयुक्त विद्यमानेअक्कलकुवा तालुक्यातील निवडक गावातील गरीब व गरजु कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंचे वितरण करण्यात आले. बागलाण सेवा समिती, व तेरे देस होम्स फ्रान्स/जर्मनी यांच्या संयुक्त विद्यमाने अक्कलकुवा तालुक्यातील तोडीकुंड, बेडाकुंड, भरकुंड, उमटी, साकलीउमर, वाडीबार, बोखाडी, सल्लीबार, उमरागव्हाण, चिवलउतार या सातपुडा पर्वत रांगेतील 10 गावात सुमारे 1000 कुटुंबांना जीवनावश्यक साहीत्याचे वाटप करण्याचे नियोजन आहे. त्यापैकी दि.10 व 11 तारखेला तोडीकुंड, चिवलउतार, उमरगव्हाण, भरकुंड, सल्लीबार, बेडाकुंड या गावात 500 कुटुंबांना खाद्यतेल, मिरची पावडर, हळद पावडर, मीठ, दाळ, साखर, चहा पावडर, साबण अशा साहीत्याचे किट बनवुन 500 किटचे वाटप करण्यात आले. साहीत्याचे वाटप करतांना सोशल डिस्टंसिंगचे जाणिवपुर्वक पालन करण्यात आले. यावेळी आरोशि प्रकल्पाच्या प्रकल्प समन्वयक पुष्पलता ब्राम्हणे यांनी उपस्थितांना कोरोना विषाणु पासुन बचावासाठी सोशल डिस्टंसिंग, वारंवार साबणाने हात धुणे, चेहऱ्याला व नाका – तोंडाला हात न लावणे आणि महत्त्वाचे म्हणजे अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडणे, या प्रकारच्या सुचना तथा माहीती दिली. जीवनावश्यक वस्तूं वाटपाचे नियोजन व वितरण संस्थेचे सचिव राजु शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. अक्कलकुव्याचे प्रभारी तहसीलदार विजय कच्छवे यांनी यासाठी सहकार्य केले. पुष्पलता ब्राम्हणे, श्रीमती आशालता पिंपळे, सुधिरकुमार ब्राम्हणे, संजय पिंपळे, स्वप्निल पवार, बाज्या वसावे, मोतीराम पाडवी, जमुनाबाई वळवी, कालुसिंग वळवी, सुभाष पाडवी, रमेश पाडवी यांनी प्रत्यक्ष लोकांपर्यत मदत पोहचविण्यासाठी परिश्रम घेतले.