नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील 4, तळोदा तालुका 1, शहादा तालुक्यातील 41 , नवापूर तालुक्यातील 13 व नंदुरबार तालुक्यातील 15 अशा एकूण 84 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी गुरुवार 18 मे 2023 रोजी मतदान होणार आहे. निवडणूकीसाठी मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या मतदान अधिकारी, कर्मचारी यांना मतदान साहित्य घेऊन जाण्यासाठी बुधवार 17 मे 2023 रोजी रवाना करण्यात येणार आहे.

त्यामुळे निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींच्या स्थानिक संस्थेच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयास 17 व 18 मे 2023 या दोन्ही दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. तसेच  निवडणूक क्षेत्रातील सर्व दुकाने,आस्थापना,निवासी हॉटेल्स,खाद्यगृहे, व्यापार,औद्योगिक उपक्रम किवा आस्थापना मधील मतदार, कामगारांना गुरुवार 18 मे 2023 रोजी मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता भरपगारी सुट्टी जाहिर करण्यात आल्याचे आदेश उपजिल्हाधिकारी गोंविद दाणेज यांनी निर्गमित केले आहे.