नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्राबाहेर येणाऱ्या शहादा तालुक्यातील 35 व नंदुरबार तालुक्यातील 41 अशा एकुण 76 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत तालुकास्तरावर 29 जानेवारी 2021 रोजी शहादा व नंदुरबार तहसिल कार्यालयात काढण्यात येणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट असलेल्या एकुण 519  ग्रामपंचायती व अनुसूचित क्षेत्राबाहेरील 76 ग्रामपंचायती अशा एकूण 595 ग्रामपंचायतींमधील महिला सरपंच पदाची आरक्षण सोडत 4 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथील बिरसामुंडा सभागृहात काढण्यात येणार आहे.सदर आरक्षण हे 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2025 या पाच वर्षाच्या कालावधीत सार्वत्रिक निवडणूका होऊन गठित होणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी लागू असणार आहे.

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सदर आरक्षण काढतांना घेण्यात येणाऱ्या सभेत सार्वजनिक आरोग्य विभाग व मदत व पुर्नवसन विभाग तसेच जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी वेळोवेळी दिलेल्या आरोग्यविषयक सुचना व आदर्श कार्यप्रणाली संहिता या बाबींचे पालन होण्याबाबत कटाक्षाने काळजी घेण्यात यावी, असे उपजिल्हाधिकारी बबन काकडे यांनी कळविले आहे.