नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  आदिवासी विकास विभागामार्फत केंद्र शासनाकडील विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या दारिद्रय रेषेखालील शेतकऱ्यांना शेवगा पोषण बाग लागवड योजनेसाठी तळोदा,अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्याकडून 19 जानेवारी 2022 पर्यत अर्ज मागविण्यात येत आहे.

या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना नगदी पीक किंवा कमी कालावधीचे कमी खर्चाचे व आर्थिक उत्पन्नासाठी दैनंदिन आहारातील शुध्द व ताजा भाजीपाला, फळे असणारी पोषण बाग तयार करुन त्यामध्ये बहुवर्षींय पिके शेवगा, लिंबु, कडीपत्ता, अळु इत्यादी लागवड करावयाची आहे.

योजनेसाठी शेतकरी अनुसूचित जमातीचा असावा, लाभार्थ्यांकडे 1 हेक्टर शेत जमीन असावी. पाण्याची उपलब्धता असल्याचा दाखला, लाभार्थीच्या नावे सातबारा उतारा, 8 अ उतारा, विधवा, परितक्त्या स्त्रिया, दिव्यांग असल्याचा दाखला. जातीचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, दारिद्रय रेषेखालील (बीपीएल) दाखला व प्रमाणपत्र, रहिवास दाखला, बॅक पासबूक अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो, ग्रामसभेचा ठराव, तसेच यापुर्वी या योजनाचा लाभ आदिवासी विकास विभाग अथवा अन्य विभागामार्फत न घेतल्याचे स्वघोषणापत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.

 योजनेच्या अधिक माहिती  व  अर्जासाठी (सुटीचे दिवस वगळून ) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, तळोदा जि. नंदुरबार येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.