नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): नागरिकांनी पर्यावरणाचे व निसर्गाचे रक्षण, संवर्धन करण्यासाठी  वृक्ष लागवड करुन मानवी जीवनाकरीता आरोग्यदायी वातावरण  निर्माण करणे, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन उपवनसंरक्षक कृष्णा भवर यांनी केले आहे.

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सामाजिक वनीकरण विभाग, नंदुरबार व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक वनीकरण क्षेत्र, नंदुरबार अंतर्गत बंधारपाडा येथील रोपवाटीकेत  तसेच जिल्हा कारागृह परिसर साक्री रोड, नंदुरबार येथे वृक्षरोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी ते  श्री. भवर बोलत होते. यावेळी जिल्हा कारागृहाचे अधिक्षक आर. आर. देशमुख,  जि.प. चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, सहायक वनसंरक्षक अमितराज जाधव, धनंजय पवार वरीष्ठ तुरुंगाधिकारी बी. डी. श्रीराव, वनपरिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती वर्षा चव्हाण, सुभेदार जी. जी. बोरसे, कारागृहातील आर. एन. बागुल, आर. जी. चव्हाण, ओ.जी. मते, शोएब खाटीक व कर्मचारी तसेच सामाजिक वनीकरण क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी व अधिनस्त कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी उपवनसंरक्षक श्री.भवर म्हणाले की, यावर्षी जून ते सप्टेंबर या वनमहोत्सव साजरा करण्यात येणार असून या कालावधीत जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी. पावसाळ्यात ग्रामपंचायतस्तरावर, शेतामध्ये, गायरान पडीत जमिनीवर, शाळा-महाविद्यालय, प्रशासकिय यंत्रणांची कार्यालय परिसरात तसेच आपल्या घराच्या आजुबाजूस मोकळ्या जागेवर झाडाची लागवड करुन त्याचे जतन करावे. मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करुन निसर्गाचे व पर्यावरणाचा समतोल साधावा, असे आवाहन त्यांनी करून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनाबाबत जिल्ह्यात सर्व ठिकाणी सामाजिक वनीकरण व नंदुरबार वनविभागातील वनक्षेत्रस्तरावर, स्थानीक लोक प्रतिनिधी तसेच तालुकास्तरीय प्रशासकीय यंत्रणांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड, वृक्ष दिंडी  कार्यक्रम संपन्न होत असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

कारागृह अधीक्षक श्री.देशमुख म्हणाले की, येत्या पावसाळ्यात जिल्हा कारागृह परिसरात जास्तीत जास्त झाडे लागवड करुन ते जतन करण्याचा मानस असून यासाठी आवश्यक रोपे सामाजिक वनीकरण विभागाच्या बंधारपाडा रोपवाटीकेतून रोपे पुरवठा करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी बंधारपाडा येथील रोपवाटीकेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, उपवनसंरक्षक कृष्णा भवर, सहायक वनसंरक्षक अमितराज जाधव, धनंजय पवार यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली तसेच जिल्हा कारागृह परिसरात  जिल्हा कारागृहाचे अधिक्षक आर. आर. देशमुख, वरीष्ठ तुरुंगाधिकारी बी. डी. श्रीराव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत पर्यावरण संरक्षण व संवर्धनाबाबत शपथ घेण्यात आली.

या वर्षी सामाजिक वनीकरण विभागामार्फत नागरीकांच्या सोयी करीता सवलतीच्या दराने रोपे वाटप करण्यात येणार असून नागरीकांनी या योजनेचा लाभ घेऊन अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग, नंदुरबार यांनी केले आहे.