नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात वादळामुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने तातडीने पूर्ण कले असून  नागरिकांना मदत देण्यासाठी शासनाकडे 1 कोटी 71  लाखाची मागणी करण्यात आली आहे.

काही दिवसापूर्वी झालेल्या वादळामुळे जिल्ह्यात  घरांचे व शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शहादा आणि तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागात अधिक नुकसान झाले. पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी वादळग्रस्त भागांना भेट देऊन तातडीने पंचनामे करण्याची सूचना प्रशासनाला केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी विविध यंत्रणांना निर्देश दिले होते. कृषी आणि महूसल विभागातर्फे पंचनाम्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात येऊन प्रशासनाला अहवाल सादर करण्यात आला आहे.

शहादा तालुक्यात 87 तर तळोदा तालुक्यात 4 घरांची पूर्णत: पडझड झाली आहे. दोन्ही तालुक्यात अंशत: पडझड झालेल्या कच्च्या घरांची संख्या 1110 आहे. यात 459 शहादा तालुक्यातील तर 648 तळोदा तालुक्यातील आहेत. तर तळोदा तालुक्यात एक दुधाळ जनावर मृत्यूमुखी पडले आहे. झालेल्या नुकसानाबाबत नागरिकांना मदत करण्यासाठी निकषानुसार 81 लाखाची मागणी  करण्यात आली आहे.

शहादा तालुक्यात 319 तर तळोदा तालुक्यात 285 शेतकऱ्यांच्या 362 हेक्टरक्षेत्रावरील  बागायत पिकांचे  (फळपिके सोडून) 33 टक्क्यापेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. त्यासाठी निकषानुसार 49 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील 323 शेतकऱ्यांचे  फळपिकाखालील बाधित क्षेत्र 231 हेक्टर आहे. त्यासाठी 41 लाखांची मागणी करण्यात आली आहे.