नंदुरबार : कोविड-19 प्रतिबंधासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात राज्य शासनाच्या सुचनांनुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी जिल्ह्यात काही बाबीत शिथीलता देण्याचे निर्देश दिले आहेत.

शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्हा ऑरेंज झोनमध्ये येत असल्याने ही शिथीलता देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश आहे-

• चालक व दोन प्रवाशांसह टॅक्सी व कॅब सुरू राहील. आवश्यक परवानगी घेऊन जिल्ह्यातल्या जिल्ह्यात व्यक्ती आणि वाहनांना फिरण्यास परवानगी असेल.
• अनुज्ञेय कामासाठी वाहन नेण्यास परवानगी असेल. चारचाकी वाहनासाठी वाहनचालकाच्या मागील बाजूस केवळ दोन व्यक्तींना अनुमती असेल. दुचाकी वाहनावर सहप्रवाश्यास बंदी असेल. त्यासाठी इन्सिडंट कमांडर पासेस देतील.
• अत्यावश्यक सेवा देणारे व सतत मशीन सुरू ठेवणाऱ्या औद्योगिक आस्थापना सुरू राहतील. तसेच यापूर्वी परवानगी दिलेल्या आस्थापना योग्य खबरदारी घेवून सुरू राहतील.
• ग्रामीण भागातील सर्व बांधकामे सुरू राहतील.
• ग्रामीण भागातील सर्व औद्योगिक आस्थापना सुरू राहतील.
• बाहेरून कामगार आणण्याची आवश्यकता नसलेली शहरी भागातील बांधकामे सुरू राहतील.
• शहरी भागातील एकाकी दुकाने, संकुलाजवळील तसेच निवासी संकुलातील दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी असेल. आवश्यक व अनावश्यक असा कोणताही भेद न करता एका रांगेत किंवा एका रोडवर (लेनमध्ये) केवळ पाच दुकाने पूर्वपरवानगीने सुरू राहीतल. पाचपेक्षा अधिक दुकाने असल्यास केवळ अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू राहतील.
• ग्रामीण भागात मॉल वगळून सर्व दुकाने सुरू राहतील.
• अत्यावश्यक वस्तू, औषधी, वैद्यकीय साधनांची दुकाने सुरू राहतील.
• ई कॉमर्स सेवेला अनुमती राहील.
• खाजगी आस्थापना 33 टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू राहतील.
• शासकीय कार्यालयेदेखील 33 टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू राहतील.
• आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधीत सर्व कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू राहीतल.
• घराचे संरक्षण, दरवाजे बसविणे, वॉटर प्रुफींग, पूरापासून रक्षण, घराची डागडुजी, धोकादायक इमारती जमिनदोस्त करणे यासारखी मान्सूनपूर्व कामे सुरू राहीतल.
• देशी/विदेशी दारू ‍विक्री सुरू राहील, मात्र एकावेळी 5 ग्राहक असतील व ग्राहकात 6 फुटाचे अंर राहील याची दुकानदारांनी दक्षता घ्यावी. उत्पादन शुल्क विभागाने याची अंमलबजावणी करावी.

उर्वरीत बाबींवरचे निर्बंध तसेच ठेवण्यात आले आहेत. या बाबी खालीलप्रमाणे आहेत-

• संरक्षण विभागाच्या बाबी व गृह मंत्रालय भारत सरकार यांनी परवानगी दिलेल्या बाबी वगळून रेल्वेने सर्व प्रकारची वाहतूक बंद असेल. गृह मंत्रालयाने निर्देश दिलेल्या बाबी सोडून आंतरराज्य प्रवाशांची ने-आण करण्यास बंदी असेल.
• सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद असतील, परंतु ऑनलाईन शिक्षण सुरू राहील.
• आरोग्य, पोलीस, शासकीय कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, क्वॉरंटाईन सुविधा सोडून इतर सर्व आदरातिथ्यशील (हॉस्पिटॅलिटी) ठिकाणे बंद राहतील.
• सर्व सिनेमागृहे, शॉपिंग मॉल, व्यायाम शाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, जलतरण तलाव, एंटरटेंनमेंट पार्क, बार, ऑडीटोरिअम, एकत्रित येण्याची ठिकाणे बंद राहतील.
• सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक समारंभ व इतर अनुषंगीक कार्यक्रमात एकत्र येण्यास बंदी असेल.
• लोकांसाठी सर्व धार्मिक व प्रार्थनास्थळे बंद असतील, तसेच धार्मिक कार्यासाठी एकत्रित येण्यास बंदी असेल.
• सायंकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत अत्यावश्यक सेवेखेरीज इतर बाबींसाठी ये-जा बंद राहील.
• 65 वर्षापेखा अधिक वय असणारे, गंभीर आजार असणारे व्यक्ती, महिला व 10 वर्षापेक्षा कमी वय असणारी लहान मुले यांना अत्यावश्यक व आरोग्य सेवा मिळविण्याखेरीज बाहेर निघण्यास बंदी असेल.
• कंटेन्टमेंट झोनमध्ये बाह्यरुग्ण सेवा व मेडिकल क्लिनिक्स यांना परवानगी नसेल, परंतू या क्षेत्राबाहेर सोशल डिस्टन्सिंग पाळून आणि इतर सावधगिरी बाळगून परवानगी असेल.
• आंतर जिल्हा व जिल्हांतर्गत बस सेवा बंद असेल.
• शॉपिंग मॉल, कॉम्पलेक्स, मार्केट बंद राहील.
• पान, तंबाखूची दुकाने बंद असतील.
प्रतिबंधीत क्षेत्रासाठी मात्र सर्व कडक निर्बंध पूर्वीप्रमाणे लागू राहतील. या क्षेत्रात अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवेसाठी अनुमती राहील. कोणत्याही वाहनाची व नागरिकांची ये-जा तपासणीशिवाय असणार नाही.

नागरिकांनी दैनंदीन व्यवहारात बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टन्सिंग म्हणजेच दोन व्यक्तींमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवावे. अनावश्यक बाहेर फिरणे आणि गर्दी टाळावी. दुकानदारांनीदेखील एकावेळी 5 पेक्षा जास्त ग्राहक असणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. लग्नामध्ये 50 पेक्षा अधिक आणि प्रेतयात्रेत 20 पेक्षा अधिक व्यक्ती असणार नाहीत याची नागरिकांनी दक्षता घ्यावी.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे किंवा सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे, पान/ तंबाखू खाणे हा अपराध मानला जाईल. सर्व प्रकारच्या आस्थापनांनी सॅनिटायझरची व्यवस्था करणे बंधनकारक राहील. सर्व खाजगी व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेतू ॲप वापरणे बंधनकारक आहे. आस्थापनांनी मोठ्या बैठका टाळाव्यात.

कोविड-19 चे लक्षण असलेल कर्मचाऱ्यांचे विलगीकरण करून त्यांना कोविड रुग्णालयात दाखल करण्यात यावे, त्यासाठी कोविड-19 रुग्णालयाची माहिती दर्शनी भागात लावावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास दिलेली परवानगी रद्द करण्यात येणार असून आ पत्ती व्यवस्थापन कायदा व भारतीय दंड संहिता 1860 नुसार कारवाई करण्यात येणार आहे.