नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): मा. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार  मतदार नोंदणी नियम 1960 मध्ये सुधारणा केली असून मतदार यादीत नव्याने नाव समाविष्ट करण्यासाठी आता प्रत्येक वर्षाकरीता दिनांक 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै, 1 ऑक्टोबर या अर्हता दिनांकवर नोंदणीसाठी पात्र असलेले अर्जदार आगाऊ अर्ज सादर करु शकतील.

मतदार यादी पुर्व- पुनरीक्षण कार्यक्रम असा: गुरुवार 4 ऑगस्ट, 2022 ते 24 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणिकरण करणे,दुबार, समान नोंदी, एका पेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रृटी दूर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करुन मतदारयादीत सुधारणा करो, विभाग,भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करुन मतदान केंद्रांच्या सीमांचे पुनर्रचना तयार करुन, मतदान केंद्राच्या यादीला मान्यता घेणे आणि तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्याचा कालबध्द योजना आखण्याचा कार्यक्रम करण्यात येईल. मंगळवार 25 ऑक्टोंबर 2022 ते 7 नोव्हेंबर 2022 या कालावधीत नमुना 1 आठ तयार करुन 1 जानेवारी 2023  या अर्हता दिनांकावर आधारीत पुरवणी व एकत्रीत प्रारुप यादी तयार करण्यात येईल.

मतदार पुनरिक्षण  कार्यक्रम : बुधवार 9 नोव्हेंबर 2022 रोजी एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तर 9 नोव्हेंबर 2022 ते 8 डिसेंबर 2022 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येईल. दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या दिवशी विशेष मोहिम राबविण्यात येईल. 26 डिसेंबर 2022 रोजी दावे व हरकती निकालात काढण्यात येईल. तर मंगळवार 3 जानेवारी 2023 रोजी मतदारयादी अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, व डाटाबेस अद्ययावत करणे तसेच पुरवणी याद्यांची छपाई करण्यात येवून गुरुवार 5 जानेवारी 2023  रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्धी करण्यात येईल. असे  जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी कळविले आहे.