नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्ह्यातील 64 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून निवडणूक क्षेत्रातील सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी यादिवशी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक होणाऱ्या ग्रामपंचायतीपैकी नागरी क्षेत्रालगतच्या (विशेषत: नगरपालिका क्षेत्रालगतच्या) मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये राहणारे बहुतांश मतदार हे कामधंद्याकरीता नागरी क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमाच्या आस्थापना, दुकाने, औद्योगिक आस्थापना (एमआयडीसी) इत्यादी ठिकाणी ये-जा करीत असतात. अशा मतदारांना मतदानाच्या दिनांकास मतदान करता यावे यासाठी तसेच निवडणूक मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक क्षेत्रातील सर्व आस्थापना, निवासी हॉटेल्स, खाद्य गृहे, व्यापार,औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना या मधील कामगारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी किंवा विशेष सवलत दिली आहे.

शहरी भागात किंवा निवडणुका नसलेल्या ग्रामीण भागातील दुकाने, कंपन्या, आस्थापना बंद ठेवण्याची आवश्यकता नाही. सर्व आस्थापना मालकांनी या आदेशाचे पालन करावे असे सरकारी कामगार अधिकारी धुळे यांनी कळविले आहे.