नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : शासनाने  कोरोना संसर्ग नियंत्रीत करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून संचारबंदी कालावधीत  नागरिकांच्या समस्या लक्षात घेता अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना मे महिन्यात रास्तभाव दुकानावर वितरीत होणारे धान्य मोफत देण्यात येणार आहे.

संचारबंदी कालावधीत अनेकांसमोर रोजगाराच्या समस्या असल्याने गरजू नागरिकांच्या किमान भोजनाची व्यवस्था व्हावी यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक लाभार्थ्यास 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ तर अंत्योदय योजनेतील प्रत्येक कुटुंबास 12 किलो तांदूळ आणि 23 किलो गहू मोफत देण्यात येणार आहे.

कोरोना संकटाच्या काळात सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे अन्नधान्याचे वितरण वेळेवर करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न पुरवठा विभागाने केला आहे. मार्च महिन्यात जिल्ह्यातील 1063 रास्तभाव दुकानामार्फत अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत 93 हजार 980 कुटुंबांना 943 क्विंटल गहू (फक्त अक्कलकुवा तालुक्यासाठी), 13 हजार 154 क्विंटल भरडधान्य, 18 हजार 796 क्विंटल तांदूळ आणि  940 क्विंटल साखरेचे वितरण करण्यात आले.

याच कालावधीत प्राधान्य कुटुंब लाभार्थी  योजनेअंतर्गत 1 लाख 38 हजार 883 कुटुंबांना 749 क्विंटल गहू (फक्त अक्कलकुवा तालुक्यासाठी), 11 हजार 283 क्विंटल भरडधान्य आणि 18 हजार 210 क्विंटल तांदूळाचे वितरण करण्यात आले. विशेषत: दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर अन्नधान्य मिळत असल्याने संकटाच्या काळातही कुटुंबातील सदस्यांच्या भोजनाची व्यवस्था झाली आहे.

एप्रिल महिन्यातही नेहमीच्या अल्प दरानुसार अन्नधान्य वितरण होणार असून मे महिन्यातील अन्नधान्य मोफत मिळणार आहे.  अंत्योदय योजना व प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना रास्तभाव दुकानदाराला कोणतेही शुल्क न देता आपले मे महिन्यातील अन्नधान्य घेता येईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी दिली आहे.