नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्हा प्रशासन व नाबार्डच्या माध्यमातून जिल्ह्यातील स्थानिक बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्यामार्फत तयार करण्यात आलेल्या मालाची विक्री केंद्र शासनाच्या ओएनडीसीच्या डिजिटल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर करता यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा संपन्न झाली.

            जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात झालेल्या या कार्यशाळेस जिल्हाधिकारी मनीषा खत्री, नाबार्डचे  जिल्हा प्रबंधक प्रमोद पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे  उद्योग अधिकारी दिलीप पाटील, ओएनडीसीचे प्रोटीन टेक्नॉलॉजीचे व्हाईस प्रेसिडेंट अंकुश देशपांडे, रॉबिन पांडे, कृषी विज्ञान केंद्राच्या आहार तंज्ञ आरती देशमुख आदी उपस्थित होते.

            यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री म्हणाल्या की, बदलत्या काळात डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्मचे महत्व लक्षात घेऊन जिल्ह्यातील उत्पादकांनी ओएनडीसी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वापरावर जास्तीत जास्त भर द्यावा व आपल्या व्यवसायाची वृद्धी करावी असे त्यांनी सांगितले.

नाबार्डचे श्री. पाटील म्हणाले की, ओएनडीसी हा प्लॅटफॉर्म ग्रामीण व दुर्गम भागातील महिला तसेच शेतकरी उत्पादकांना शहरी भागातील ग्राहकांपर्यंत जोडण्यासाठी प्रभावी माध्यम असून यामुळे उत्पादकांना उत्तम संधी प्राप्त होऊ शकेल. नुकताच केंद्र शासनाने पाच शहरांमध्ये ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सचा पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे. ओएनडीसी मार्फत स्थांनिक बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्यामार्फत तयार करण्यात आलेल्या मालाची विक्री करुन  महाकाय ऑनलाइन किरकोळ विक्रेत्यांचे वर्चस्व कमी करून लहान विक्रेत्यांना मदत करणे हा ओएनडीसीचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

            यावेळी ओएनडीसीचे प्रोटीन टेक्नॉलॉजीचे अंकुश देशपांडे आणि रॉबिन पांडे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील उत्पादकांना जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ओएनडीसी या डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभावीपणे वापर कसा करता येईल व या प्लॅटफॉर्मद्वारे उत्पादक व ग्राहक यांना जोडल्याने होणारी सुलभता व फायदे याविषयी चित्रफितीद्वारे सविस्तर माहिती दिली. तसेच यावेळी उपस्थित सदस्यांनी  मोबाईलच्या ॲप वापरासंबंधी माहिती जाणून घेवून विविध प्रश्नाद्वारे आपल्या शंकांचे निरसन केले. कार्यशाळेच्या शेवटी जिल्ह्यातील उत्पादकांनी तयार केलेल्या विविध उत्पादनाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील ग्रामीण भागातून विविध गटातील महिला उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक, उद्योजक व स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.