नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्य निवडणूक आयोगाच्या 17 नोव्हेंबर 2021 रोजीच्या आदेशानुसार निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे जिल्ह्यातील  45 ग्रामपंचायतीमधील 57  रिक्त जागासाठी पोटनिवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आलेला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती पुढील प्रमाणे आहेत. अक्राणी तालुक्यातील  वरेखेडी बु., अक्कलकुवा तालुक्यातील कोवलीमाळ, खापर, शहादा तालुक्यातील पिंप्री, कमरावद, मलोणी, कर्जोत, सावळदा, लक्कडकोट, करजई, गोदीपूर, शिरुडदिगर, बुपकरी, पाडळदा बु., सोनवल त.बो, मनरद, कोठली त.सा, कानडी त.श, श्रीखेड, सुलतानपूर, कुऱ्हावद त.सा.,वर्ढे त.श, नागझिरी, उधळोद, सारंगखेडा, म्हसावद, विरपूर.  तळोदा तालुक्यातील राजविहीर, मालदा, नंदुरबार तालुक्यातील पिंपळोद, धानोरा, ओसर्ली, समशेरपूर, धामळोद, नाशिंदे, लोणखेडा, शिदगव्हाण, कोरीट, घोटाणे, नगांव, करणखेडा, बोराळा. तर नवापूर तालुक्यातील खोलविहीर, बंधारपाडा, निंबोणी या 45 ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

ग्रामपंचायतीतील रिक्त पदांच्या पोटनिवडणूक कार्यक्रम असा राहील

नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी  पूर्वी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिध्द केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेच्या सुधारणा करण्याचा दि.सोमवार 22 नोव्हेंबर 2021 पर्यंत राहील. तहसिलदार सोमवार 22 नोव्हेंबर 2021 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द करतील, नमुना ‘अ’ अ मध्ये नमूद ठिकाणी  30 नोव्हेंबर 2021 (मंगळवार)  ते 6 डिसेंबर 2021 (सोमवार) रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागविता व सादर करता येतील.

मंगळवार 7 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजेपासून नामनिर्देशनपत्र  छाननी करण्यात येईल. गुरुवार 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशपत्र मागे घेता येईल. गुरुवार 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेनंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील. तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल.

मंगळवार 21 डिसेंबर 2021 रोजी  सकाळी 7.30 ते सायंकाळी 5 .30 वाजेपर्यंत मतदान होईल, तर बुधवार 22 डिसेंबर 2021  रोजी (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्येतेने तहसीलदार निश्चित करतील त्यानुसार राहील ) मतमोजणी होणार असून निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना सोमवार 27 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.

जिल्ह्यात पोटनिवडणूका होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहिर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. तसेच या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता कालावधीत करता येणार नाही, असे उपजिल्हाधिकारी  श्रीमती कल्पना निळ-ठुबे  (महसूल प्रशासन) यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.