नंदुरबार – राष्ट्रीय हरीत लवादाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील जैव वैद्यकीय कचऱ्याचे योग्य पद्धतीने विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जैव वैद्यकीय कचरा विघटनाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाटील आदी उपस्थित होते.

डॉ.भारुड म्हणाले, उपचार, निदान, विलगीकरण दरम्यान तयार होणारा जैव वैद्यकीय कचऱ्याचे संकलन पिवळ्या पिशवीत आवश्यक दक्षता घेऊन करण्यात यावे. वैयक्तिक स्तरावर वापरण्यात येणाऱ्या पीपीई कीट, मास्क आणि ग्लोव्हजचे संकलन  व्यवस्थितपणे होण्यासाठी घंटागाडी चालकांना सुचना देण्यात यावी. हा कचरा इतर कचऱ्यात मिसळणार नाही याची दक्षता घ्यावी.

तालुका स्तरावर राष्ट्रीय हरीत लवादाच्या सूचनांनुसार कचरा संकलन करण्यात यावे. संबंधित विभागाने यासाठी समन्वयक अधिकारी नेमावा. होम क्वॉरंटाईन व्यक्तीच्या घरातील जैव वैद्यकीय कचऱ्याचे योग्यरितीने संकलन होईल याची दक्षता स्थानिक स्वराज्य संस्थेने घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

बैठकीत श्रीमती पाटील यांनी राष्ट्रीय हरीत लवादाच्या सुचनांची माहिती दिली. श्री.काकडे यांनी सादीकरणाद्वारे जैव वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याबाबतची माहिती दिली. बैठकीस नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि इतर संबंधीत अधिकारी उपस्थित होते.