नंदुरबार (प्रतिनिधी) – जप्त केलेले वाहन सुस्थितीत परत करावे, अथवा वाहनाची रक्कम 7 लाख रुपये तक्रारदाराला व्याजासह परत करावी, असा निकाल नंदुरबार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने चोला मंडलम या फायनान्स कंपनीला दिला आहे.


 या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, नंदुरबार येथील नसीर शहा रमजान शहा यांचे एम. एच. 18 डब्ल्यू – 65 67 या क्रमांकाचे सुमारे 14 लाख रुपये किमतीचे वाहन आहे. यावर त्यांनी चोला मंडलम या फायनान्स कंपनीकडून पाच लाख रुपयाचे कर्ज घेतले होते. त्यांचा व्यवहार चांगला असल्याने कंपनीने पुन्हा त्यांना तीन लाखाचे कर्ज मंजूर केले. शहा यांनी दोन्ही कर्जाचे हप्ते नियमित भरले आहेत. तथापि या वाहनाचा दिनांक 28 मे 2019 रोजी अपघात झाला होता. त्यानंतर काही हप्ते थकीत झाले. त्यामुळे फायनान्स कंपनीने त्यांना कोणतीही पूर्वसूचना अथवा रीतसर नोटीस न देता जबरदस्तीने वाहन बेकायदेशीर ताब्यात घेतले. याबाबत शहा यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देखील दाखल केली आहे. जप्त केलेले वाहन परत देण्यासाठी शहा यांनी विनंती केली. मात्र फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चुकीचे मूल्यांकन करून सहा लाख 53 हजार 88 रुपयांचे कर्ज थकीत दाखवीत वाहनाची 4 लाख 60 हजार रुपयाला विक्री केल्याची माहिती तक्रारदार शहा यांना दिली. वाहनांची किंमत 14 लाख रुपये असताना सदरचे वाहन हे कमी किमतीत विक्री केल्याचे दाखवून कंपनीने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला. याबाबत शहा यांनी अ‍ॅडव्होकेट धनराज बी. गवळी यांच्यामार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली होती. या आयोगाचे अध्यक्ष एस. पी . बोरवाल,  सदस्य श्रीमती बी.पी. केतकर, एम. एस. बोडस या त्रिसदस्यीय न्यायासन समोर खटल्याची सुनावणी चालली. तक्रारदार नसीर शहा यांच्यातर्फे अ‍ॅडव्होकेट धनराज बी. गवळी यांनी भक्कमपणे बाजू मांडत ग्राहक तक्रार निवारण आयोगाला वस्तुस्थिती पटवून दिली. दरम्यान दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून तक्रारदाराच्या बाजूने मंचाने निकाल दिला आहे. चोलामंडलम या कंपनीने  45 दिवसाच्या आत जप्त केलेले वाहन तक्रारदाराला परत करावे, अथवा वाहनाची रक्कम सात लाख रुपये व्याजासह परत करावी तसेच मानसिक व शारीरिक त्रासापासून तक्रारदाराला तीन हजार रुपये भरपाई द्यावी असा निकाल दिला आहे.