नंदुरबार (प्रतिनिधी) :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाला धुडकावत जिल्हाभरात गुटखा तंबाखू व सिगरेटची तब्बल चार ते पाच पट दराने विक्री होत असल्याने सामान्य जनतेच्या व्यसनापोटी प्रचंड लूट होत असल्याचे दिसत असून, याप्रकरणी संबंधित विभागाने दूर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यात लाॅकडाऊन काळात सर्व पण तंबाखू विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे टपऱ्या सील करण्यात आल्या. मात्र, यामुळे व्यसनाच्या आहारी गेलेली काही तरूण मंडळी गुटखा, बार, तंबाखू, सिगारेटसाठी आतूर झालेली पहायला मिळाले. त्यामुळे गैरफायदा घेण्यात पटाईत असलेल्या काही गुटखा किंग मंडळी अव्वाच्या सव्वा भावात गुटखा व तंबाखू विक्री करतांना दिसत आहेत. काही व्यवसायीक तर चक्क व्हाॅटसपवर यादी मागवून पानपट्टी माल म्हणजे गुटखा पुड्या, तंबाखू पुड्या व सिगारेट थेट घरी पोहच करत असल्याचे बोलले जात आहे. काही किराणा दुकानदार व्हि.आय.पी. ग्राहकालाच गुटखा विक्री करत आहेत. या साऱ्या प्रकारामुळे कोरोना विषाणूचे गांभीर्य कुणालाही नसल्याचे प्रदर्शित होत असून, व्यवसायीकांनी मात्र चंगळ करून घेतली आहे.
काही तरूण मुले लॉकडाऊनच्या काळात चौका चौकात गुटखा, तंबाखू, सिगारेट विक्री करतांना दिसत आहेत. 3 तारखेला दुकाने उघडल्यानंतरही पण सिगारेटची दुकाने उघडतील अशी शक्यता नाही. त्यामूळे ही बेकायदा गुटखा तंबाखू विक्री कोणत्या स्तरावर पोचेल, हे सांगणे कठीण आहे. याप्रकरणी एफ.डि.ए. विभागाने लक्ष घालणे गरजेचे असून, कारवाई होणे महत्वाचे आहे.