नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :प्रतिबंधीत क्षेत्रातील प्रत्येक संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीवर अधिक भर द्यावा, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यानी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पांडा, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, आदी उपस्थित होते.

            ॲड.पाडवी म्हणाले, प्रतिबंधीत क्षेत्रात नागरीकांच्या प्रबोधनावर भर द्या. खाजगी कोविड रुग्णालयात शासकीय दराने सेवा दिली जाईल व नियमांचे पालन होईल यांची दक्षता घ्यावी. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. त्यासाठी रुग्णाची प्राथमिक लक्षणे असताना स्वॅब तपासणी होईल याकडे लक्ष द्यावे असे त्यांनी सांगितले.

आरोग्य मंत्र्याशी दूरध्वनीवरुन चर्चा

पालकमंत्री ॲड.पाडवी यांनी बैठकी दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. उपचारासाठी लागणारे इंजेक्शन व औषधे तात्काळ उपलब्ध करुन देण्याचे श्री.टोपे यांनी मान्य केले आहे. औषधांच्या उपलब्धतेसाठी आमदार निधीतून सहकार्य करणार असल्याचे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले. बैठकीत महिला रुग्णालयाच्या इमारतीत कोविड हॉस्पीटल सुरु करण्याबाबत तयारी, ऑक्सिजनची उपलब्धता, कोविड हॉस्पीटल आणि कोविड केअर सेंटरची क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.