नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : शिक्षकांनी ज्ञानादानासोबत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांचे प्रबोधन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले.

‘विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाटचाल आणि कोरोना विषयक दक्षता’ या विषयांवर जिल्ह्यातील पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी आयोजित ऑनलाईन संवाद साधताना ते बोलत होते.

डॉ.भारुड म्हणाले, शिक्षकांनी  कोरोनाकाळात प्रशासनास चांगले सहकार्य केले आहे. जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणाली सुरळीत करणे, कोविड केअर सेंटर, नियंत्रण कक्ष तसेच ॲन्टी कोविड फोर्समध्ये त्यांचे हे योगदान वाखाण्याजोगे आहे. शिक्षकांच्या क्षमता आणि समाजावरील प्रभाव लक्षात घेता संकटाच्या काळात शिक्षकांकडून अधिक अपेक्षा आहेत.

शिक्षकांनी शक्य असेल तेथे 50 विद्यार्थ्यांचे समूह करून ॲपद्वारे मार्गदर्शन करावे. यावेळेत त्यांना थोर संत, महापुरुषांच्या जीवनाबद्दल माहिती द्यावी. शिक्षक आणि पालक यांनी पुढाकार घेऊन  मुलांना या काळात चांगल्या गोष्टी शिकवाव्यात. पालकांनी कोरोना काळात आपल्या व्यवसायासंबंधी कामात मुलांना सोबत घ्यावे व त्यांना कामाचा अनुभव द्यावा.

कोरोना काळात विद्यार्थ्यांनी जास्त वेळ टि.व्ही आणि इंटरनेटचा वापर केल्यास विद्यार्थ्यांमध्ये चिडचिडपणा, झोप न येणे अशा आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना  विविध पुस्तके वाचावयास द्यावीत. विद्यार्थ्यांचा उत्साह कायम ठेवण्यासाठी त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण करावी व सृजनात्मक कामात त्यांना गुंतवावे. त्यांना आदर्श दिनचर्या अनुसरण्यास  प्रवृत्त करावे. त्यामुळे मुलांना  चांगली सवय लागण्यासोबत त्यांच्यात नैसर्गिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल.

समाजाने कोविड बाधितांचा मोकळेपणाने स्विकार करावा व त्यांना सहकार्य करावे, कोरोनाबाधितांना प्रोत्साहनाची, सकारात्मक प्रेरणेची गरज आहे. शिक्षकांनी याबाबत नागरिकांना माहिती द्यावी. ग्रामीण भागात ज्याठिकाणी इंटरनेट बाबत अडचणी आहे त्याठिकाणी गावातील उच्च शिक्षित तरुण तरुणींनी पुढाकार घेऊन  विद्यार्थ्यांना वाचन, लिखाण आदी मुलभूत गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवाव्यात असे त्यांनी यावेळी सांगितले.

डॉ.भारुड यांनी कोरोना नियंत्रण व उपचारासाठी प्रशासनातर्फे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सुविधांबाबत माहिती दिली तसेच प्रशासनातर्फे उत्तम सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न येत असल्याचे त्यांनी सांगितले. या ऑनलाईन संवाद कार्यक्रमांत 34 हजार विद्यार्थीं, 6 हजार शिक्षक, 12 हजार पालकांनी सहभाग घेतला.