नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’ आणि वृक्ष संवर्धनाची सांगड घातल्यास ग्रामीण जनतेला आर्थिक लाभ होण्यासोबत पर्यावरणाचे रक्षण चांगल्यारितीने करता येईल. त्यादृष्टीने वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाने आर्थिक लाभ देणारी झाडे लावण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहीत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड  यांनी केले. टोकरतलाव येथील रोपवाटीकेत पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. वटपौर्णिमेचे औचित्य साधून वड आणि पिंपळाची झाडे यावेळी लावण्यात आली. यावेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, तृप्ती धोडमिसे, उप वनसंरक्षक सुरेश केवटे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनअधिकारी ए.के. धानापुणे,  वनक्षेत्रपाल एम.के.रघुवंशी, वनक्षेत्रपालक एस.सी.अवसरमल, सहायक वनसरंक्षक टि.डी.नवले, वन परिक्षेत्र अधिकारी रघुवंशी,  सरपंच महिपाल गावीत आदी उपस्थित होते.

डॉ.भारुड म्हणाले, शेतकऱ्यांना सागाची झाडे लावल्याने होणाऱ्या दीर्घकालीन लाभाविषयी त्यांच्या भाषेत माहिती देण्यात यावी. त्यासोबत शेताच्या बांधावर आंबा, महूआ, बांबू अशी आर्थिक उत्पन्न देणारी झाडे लावण्यासाठी प्रोत्साहीत करावे. स्थानिकरित्या रोपवाटीका तयार करण्याची माहितीदेखील ग्रामीण भागातील जनतेला देण्यात यावी. तीन वर्षापर्यंत मनरेगाच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनाची व्यवस्था होणार असल्याने शेतकऱ्यांना वृक्ष लागवडीतून चांगले उत्पन्न मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले.रोपवाटीकांची संख्या वाढवावी आणि प्रत्येक रोपवाटीकेत, वड, पिंपळ, साग, आंबा आदी लाभदायक वृक्षांची रोपे निश्चित प्रमाणात असतील याकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यावेळी वृक्षारोपणात सहभाग घेतला.