नंदुरबार : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून नवापूर तालुक्यात चांगले काम सुरू असून विविध यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करून 15 हजार मजूरांना काम उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी  डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.

नवापूर येथे मनरेगाच्या कामांना भेट दिल्यानंतर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, तहसीलदार राजेंद्र नजन, गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

डॉ.भारुड म्हणाले, प्रत्येक ग्रामपंचायतीने एक मोठे काम आणि गाळ काढण्याचे काम सुरू करावे. सीसीटीची कामे सुरू करून त्याशेजारी वृक्षलागवड करण्यात यावी. वन विभागाने वनतळे किंवा वनतळ्यातील गाळ काढण्याचे काम हाती घ्यावे. ज्या ठिकाणी कुठलेच काम नसेल तिथे वनीकरणाचे काम सुरू करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. कडवान येथील काळ काढण्याच्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

वराडीपाडा येथे सरपणी नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यांनी गंगापूर येथील कामालाही भेट देवून कामांची माहिती घेतली आणि मजूरांशी संवाद साधला. लहान कडवान येथे 3000 घनमीटर गाळ काढण्यात येणार असून 30 लक्ष लीटर साठवण क्षमता वाढणार आहे. येथे 146 मजूर काम करीत आहेत. वराडीपाडा येथे 236 तर गंगापूर येथे 104 मजूर काम करीत असून तालुक्यात 6 हजारापेक्षा अधिक मजूरांना काम उपलब्ध झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

डॉ.भारुड यांनी गुजरात सीमेवरील आरटीओ चेकपोस्टला भेट दिली. मजूरांना राज्याच्या सीमेवर पोहोचविण्याची व्यवस्था करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल याकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी नवापूर शहरातील काही भागात भेट देऊन पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्याच्या सुचना मुख्याधिकाऱ्यांना दिल्या. शहरात स्वच्छतेची कामे त्वरीत सुरू करण्यात यावीत, असे त्यांनी सांगितले. गावातील दुकाने नव्या निर्देशानुसार सुरू करताना गर्दी होणार नाही आणि करोनाविषयक नियमांचे पालन होईल याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. पंचायत समितीच्या रेकॉर्डरूमला भेट देऊन त्यांनी समाधान व्यक्त केले.

कृषी विभागामार्फत तालुक्यातील शेतकऱ्यांना बांधावर खते उपलब्ध करून देण्याचा शुभारंभदेखील जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.