नंदुरबार :- शहरातील 48 वर्षीय एक रुग्ण कोरोना पॉसिटीव्ह असल्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे, अशी माहिती नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली आहे. यामुळे आतापर्यंत एकही कोरोना रुग्ण नसलेल्या नंदुरबार जिल्ह्यालाही कोरोनयुक्त जिल्ह्याचे लेबल लागले आहे.
याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी एक ध्वनिफीत जारी केली आहे. नंदुरबार शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला असून, हा रुग्ण काही दिवसांपूर्वी मालेगाव येथे जाऊन आला होता. हा रुग्ण नंदुरबार शहरातील प्रभाग क्रमांक 10 च्या भागातील रहिवासी आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून अली साहेब मोहल्ला भागाचा एक किलोमीटर परिसर कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असून, त्याच्या 1 ते 2 किलोमीटर परिसरात कोणत्याही वाहनास अनुमती नसेल, तसेच कोणतेही व्यवहार सुरू राहणार नाहीत. तीन दिवस शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी संचारबंदीचे कठोरपणे पालन करावे, तसेच घाबरून न जाता घरातच राहावे, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, अनावश्यक बाहेर फिरताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी कळविले आहे. दरम्यान याप्रकरणी संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना विलगिकरण कक्षात ठेवण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे वृत्त आहे.