नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी जिल्‍हा पोलीस दलामार्फत तोंडाला मास्क व सोशल डिस्टन्सींगचे पालन करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यात कोविड-19 विषाणूचा प्रार्दुभाव वाढत असून गेल्या 8 ते 10 दिवसात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोविड-19 विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून शासनाने सर्व नागरिकांना मास्कचा वापर करण्याचे व सामाजिक अंतराचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

            जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना विषाणुचा प्रसार होऊ नये व त्यावर आळा घालण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. तोंडाला मास्क न लावणाऱ्या तसेच सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर पोलीस दलामार्फत गुन्हे दाखल करण्यात येणार असून अशा व्यक्तींना प्रत्येकी 2 हजारपर्यंत द्रव्य दंड किवा 5 दिवसाची कैद अशी शिक्षा होऊ शकते. कारवाई टाळण्यासाठी तसेच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे व निर्देशाचे काटेकोरपणे पालन करावे,  असे आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी केले आहे.