नंदुरबार : जिल्ह्यातील नागरिकांना विविध योजनाअंतर्गत लाभ घेण्यासाठी  अडचणी निर्माण होत असल्याने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण डॉ.राजेंद्र भारुड यांनी जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र व आधार केंद्रे सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

सर्व केंद्रातील उपकरणे नियमितपणे सॅनिटाईझर करावे. केंद्राच्या ठिकाणी सर्वांनी फेस मास्क/रुमाल वापरणे बंधनकारक राहील. केंद्राच्या ठिकाणी केंद्रचालक, ऑपरेटर यांना आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार सोशल डिस्टंन्सीग, साबणाने हात धुणे व सॅनिटाईझर वापर करणे बंधनकारक राहील. केंद्रातील कर्मचाऱ्यांनी काम करतेवेळी नाक,तोंड, डोळे यांना स्पर्श करु नये.

 केंद्रात येणाऱ्या सर्व नागरिकांनी व्यक्तीगत स्वच्छता पाळावी. केंद्रातील कर्मचाऱ्यांनी प्रत्येक वेळी बायोमॅट्रीक उपकरणांचे वापरानंतर स्वच्छ करावे. एखाद्या व्यक्तीस खोकला, ताप तसेच श्वास घेण्यास त्रास होत असल्यास अशा व्यक्तींस केंद्रावर येण्यापासून परावृत्त करावे. प्रत्येक केंद्रावर युआयडीएआयने दिलेल्या मार्गदर्शक सूचना केंद्राच्या दर्शनी भागात लावाव्यात.

 हॉटस्पॉटच्या ठिकाणी रहात असलेल्या कर्मचारी, नागरिक यांना अशा केंद्राच्या ठिकाणी जाण्यास मनाई राहील. पाचपेक्षा अधिक व्यक्ती केंद्रावर जमा होणार नाही याची जबाबदारी संबंधित केंद्र चालकाची राहील. ज्या क्षेत्रात कन्टेमेंन्ट झोन लागू असेल किंवा करण्यात येईल अशा क्षेत्रातील केंद्रे बंद राहतील.

वरील सर्व सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येवून केंद्र सुरुळीतपणे सुरु ठेवण्यात यावेत.  सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.