नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम व इतर केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीबाबतचा आढावा घेण्यासाठी  जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीची बैठक खासदार डॉ. हिना गावीत यांच्या अध्यक्षतेखाली वीर बिरसामुंडा सभागृहात संपन्न झाली.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सिमा वळवी, आमदार डॉ. विजयकुमार गावीत, शिरीषकुमार नाईक, राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भारुड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा,सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, दिशा समितीचे अशासकीय सदस्य डॉ.कांतीलाल टाटीया, डॉ.रविंद्र बैसाणे, बबीता नाईक, प्रदीप वळवी उपस्थित होते.

यावेळी खासदार डॉ. गावीत म्हणाल्या, जिल्ह्यातील दुर्गम भागातील गावामध्ये वीज, सिंचन, रस्ते,  प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत होणारी कामे त्वरीत पुर्ण करावीत. घरकुलात मूलभूत सुविधा देण्यात याव्यात व कामे दर्जेदार  होतील याकडे विशेष लक्ष द्यावे. नवापूर येथील राष्ट्रीय महामार्गाचे कामे त्वरीत पुर्ण करावे. वनपट्टाधारकांना सोलरपंप, विद्युत पुरवठा,सिचंनाची सोय त्वरीत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना त्यानी दिल्या.

ग्रामीण भागात तलाठी, ग्रामसेवक,गट विकास अधिकारी यांच्या मार्फत केंद्र पुरस्कृत योजनांची माहिती देण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.भारुड यांनी दिली. 

बैठकीत ग्रामीण विद्युतीकरण, प्रधानमंत्री हरघर बिजली, सोलर ऊर्जा, हर घर नल हर घर जल, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय ग्रामीण पेजयल, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, राष्ट्रीय महामार्ग, प्रधानमंत्री आवास योजना अशा विविध योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. बैठकीस विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.