नंदुरबार (प्रतिनिधी):- कोरोना विरुद्धच्या लढ्यात मालेगाव येथे बंदोबस्तात तैनात असलेल्या नंदुरबारच्या एका पोलीस जवानाला याची लागण झाली. यातून पूर्णपणे बरा होऊन रुग्णालयातुन डिस्चार्ज मिळवलेल्या या जवानाचे पोलिसांनी चक्क बँडच्या तालावर स्वागत केले.
मालेगाव येथे बंदोबस्तादरम्यान कोरोना बाधीत झालेल्या नंदुरबारच्या पोलीस कर्मचाऱ्याचा सलग दुसरा अहवाल नकारात्मक आल्याने आज जिल्हा सामान्य रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला. या पोलीस कर्मचाऱ्याचे मनोबल वाढवण्यासाठी पोलीस अधिक्षकांसह पोलीस दलातील सारेच बडे अधिकारी त्याच्या स्वागतासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होते. यावेळी त्यांना पुष्पहार घालत व त्यांच्यावर पुष्पवर्षाव करुन त्यांचे स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे त्यांच्या घरी पोलीस दलाने बँडच्या तालावर “हर करम अपना करेंगे,” हे देशभक्तीपर गित वाजवत त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या परिसरातील नागरीकांनी देखील टाळ्या वाजवत त्याचे जोरदार स्वागत केले. नंदुरबार पोलिसांची एक तुकडी एप्रिल महिन्यात मालेगाव येथे बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली होती. त्यापैकी एकमेव जवानाला कोरोनाची लागण झाली होती. त्या जवानाला यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले.
पोलीस स्वतःचा जीव धोक्यात घालुन लोक रक्षणाचे काम करत असल्याने नागरीकांनी घरात राहुन, त्यांना सहकार्य करावे. अत्यंत महत्वाच्या कामाखेरीज घराबाहेर पडु नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी यावेळी केले. तर कोरोनामुक्त झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याने उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स, नर्स आणि पोलीस दलाचे आभार मानले.