नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोविड-19 विषाणू बाधित रुग्णाची संख्या वाढत असल्याने प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्ह्यात होळी, धुलीवंदन, रंगपंचमी व तिथीनुसार शिवजंयती सण, उत्सव, मिरवणुक, मेळावे, रॅली व व्याख्याने हे कार्यक्रम सार्वजनिक स्वरुपात घेण्यास मनाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद भारुड यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात काठी येथील राजवाडी होळी व धडगाव तालुक्यातील धडगाव, सुरवाणी, दुकान मांडवी व बिलगांव येथीम सामूहिक मोठ्या होळ्यांना गर्दी होते. चालू वर्षी होळी सणासाठी व तिथीनुसार शिवजयंतीच्या मिरवणूकांसाठी  लोकांची गर्दी होऊ नये म्हणून सदर आदेश देण्यात आले आहेत. या कार्यक्रमात जमावास बंदी राहील. अभिभाषणे व व्याख्याने  आदी कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार ऑनलाईन, सामाजिक माध्यमे यांचा वापर करण्यावर भर देण्यात यावा.

 कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.