नंदुरबार (प्रतिनिधी) :- तब्बल दिड वर्षांच्या दीर्घ अवकाशाचानंतर प्राथमिक शाळेतील विद्यार्थी शाळांमध्ये येत असून, या विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर निश्चित करून त्यांच्यासाठी सुयोग्य अध्ययन अनुभव निवडावे लागतील, असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेतील वरिष्ठ अधिव्याख्याता श्री रमेश चौधरी यांनी केले.
शासनाने ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा 1 डिसेंबर पासून सुरू करण्याची अधिसूचना जारी केली. त्या अनुषंगाने आज दिनांक 1 डिसेंबर 2021 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. काही ठिकाणी या विद्यार्थ्यांसाठी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला, तर काही ठिकाणी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. नंदुरबार तालुक्यातील टोकरतलाव येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिव्याख्याता श्री रमेश चौधरी व विषय सहायक श्री देवेंद्र बोरसे यांनी या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करतानाच शिक्षकांचे अभिनंदन केले.
यावेळी शासनाच्या परिपत्रकानुसार घ्यावयाची काळजी, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. दिर्घ अवकाशानंतर विद्यार्थी शाळांमध्ये येत असून, या विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव देण्यासाठी सर्वप्रथम त्या त्या वर्गातील अध्ययन निष्पत्तीच्या अनुषंगाने अध्ययन स्तर निश्चिती करावी लागेल, असे सांगतानाच विद्यार्थ्यांना त्या त्या इयत्तेतील किमान अध्ययन क्षमता प्राप्त व्हाव्यात, यासाठी शिक्षकांनी अध्ययन अनुभवांची निवड करावी, शाळेतील डिजिटल साधनांचा वापर करावा. भाषा, गणित व इंग्रजी विषय पेटीतील साहित्याचा अध्ययन अनुभव देण्यासाठी वापर करावा, असे प्रतिपादन वरिष्ठ अधिव्याख्याता श्री रमेश चौधरी यांनी केले. विषय सहायक श्री देवेंद्र बोरसे यांनीही यावेळी शिक्षकांशी व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
शाळेचे पदोन्नती मुख्याध्यापक श्री संजय नामदेव पाटील, सहशिक्षक श्री गौतम ईशी, श्रीमती अनुपमा वळवी, श्री डोंगरसिंग वसावे, श्री देवेंद्र वळवी, श्रीमती मंदाकिनी वळवी, कु. जया वसावे या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव देण्यासाठी केलेल्या नियोजनाची माहिती दिली.