नंदुरबार : जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन सुविधा वाढविण्यावर भर द्यावा आणि वनपट्टयात बांधलेल्या विहिरींसाठी वीज कनेक्शन देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी , असे निर्देश आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या खरीप हंगाम आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जि.प. अध्यक्षा सीमा वळवी, खासदार हिना गावीत, आमदार विजयकुमार गावीत, राजेश पाडवी, शिरीष नाईक, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम रघुवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.एन.पाटील आदी उपस्थित होते.

ॲड.पाडवी म्हणाले, शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळवून देण्यासाठी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात यावी. कापूस खरेदी वेळेवर सुरू होईल यासाठी तातडीने उपाययोजना करावी. शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि इतर कृषी निविष्ठा वेळेवर मिळतील यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण होईल याचे नियोजन करावे. ल.पा.विभागाच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठीचे अंदाजपत्रक त्वरीत सादर करावे, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

खरीप हंगाम 2020-21 साठी एकूण 38 हजार 668 क्विंटल बियाणांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली होती. त्यानुसार बियाणे उपलब्ध होणार आहे. महाबीजमार्फत  बियाण्याची उपलब्धता होणार आहे. खरीप हंगामासाठी 1 लाख 18 हजार 160 मे.टन खतांची मागणी करण्यात आली असून 1 लाख 10 हजार 875 मे.टन खते उपलब्ध होणार आहेत.किटकनाशके फवारणीबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. कृषी निविष्ठा विषयक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी  कापूस पिकाबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.