नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सीमेवर देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. अशा सैनिकांच्या सन्मानासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीत प्रत्येकाने उदारतेने योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले.

         जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, सुभेदार मेजर रामदास पाटील आदी उपस्थित होते.

                 डॉ.भारुड म्हणाले, सीमेवर जवान देशाच्या संरक्षणासाठी सज्ज असल्याने देशातील नागरिकांना सुखाची झोप घेता येते. जवान आणि किसान हे स्वतंत्र भारताचे दोन प्रमुख आधारस्तंभ आहेत. अशा जवानांच्या सन्मानासाठी ध्वजदिन निधी संकलन करण्यात येते. जिल्ह्याने गतवर्षी 101 टक्के उद्दीष्ट गाठले आहे. यावर्षीदेखील जिल्ह्यातील नागरिक या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

                 ध्वजदिन निधीसाठी 1 लाख रुपयांची रक्कम देणाऱ्या तोरणमाळ येथील आश्रमशाळा मुख्याध्यापक प्रदिप पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. त्यांची कृती इतरांनाही प्रेरणा देईल असे डॉ.भारुड म्हणाले. तोरणमाळ आश्रमशाळेचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी शुद्धीकरण प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करावा, त्यास मंजूरी देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

                 अपर जिल्हाधिकारी श्री.पाटील यांनी ध्वजदिन निधी संकलनाचा उपक्रम सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी असल्याचे सांगितले.

                 यावेळी शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहीद राजाराम खोत आणि ज्ञानेश्वर पाटील यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली.

                 गतवर्षी 31 लाख 30 हजार उद्दीष्ट असताना 33 लाख 70 हजार निधी संकलन झाले अशी माहिती यावेळी देण्यात आली.