नंदुरबार, दि. 6 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी शासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास तसेच थुंकणाऱ्यांविरुध्द 200 रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. मात्र, हाच गुन्हा वारंवार केल्यास दंडाची रक्कम वाढत जाणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत.

शासकीय कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क न लावणे, सामाजिक अंतराचे पालन न करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीं तसेच संस्था, आस्थापना विरुध्द 27 नोव्हेंबर 2021 रोजीच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 (ब) व महाराष्ट्र कोविड-19 नियम 2020 चे कलम 3 नुसार दंडात्मक तसेच फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, नंदुरबार जिल्हा अतिदुर्गम भाग असून तेथील नागरिकांचे उत्पन्नाचे साधन सामग्रीचा व इतर बाबी विचारात घेता या आदेशातील निर्बंध कायम ठेवून दंडाची रक्कम कमी करण्यात येत आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास पहिल्यांदा आढळल्यास 200 रुपये दंड, दुसऱ्यांदा आढळल्यास 400 रुपये,  तर तिसऱ्यांदा आढळल्यास 500 रुपये दंड व फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. शासकीय कार्यालयात, सार्वजनिक तसेच इतर ठिकाणी मास्क न वापरल्यास पहिल्यांदा आढळल्यास 200 रुपये दंड, दुसऱ्यांदा आढळल्यास 400 रुपये तर तिसऱ्यांदा आढळल्यास 500 रुपये दंड व फौजदारी कारवाई करण्यात येईल.

नागरिकांनी कारवाई टाळण्यासाठी तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे व निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पोलिस प्रशासन, महसूल विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागांना प्राधिकृत करण्यात आले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.