नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सामुहिक शेततळे पिकांसाठी संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करणे व दुष्काळी भागामध्ये फलोत्पादन पिकांच्या क्षेत्र विस्तारासाठी सिंचन सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने 100 टक्के अनुदानावर ही योजना राबविण्यात येत असून या योजनांचा लाभ घेण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी समूहाकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक असून पात्र शेतकऱ्यांना 34x34x4.70 आकारमानासाठी 2 हेक्टर ते 5 हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्रासाठी 3 लाख 39 हजार रुपये अनुदान  तर 24x24x4.00 आकारमानासाठी  1 हेक्टर ते 2 हेक्टर क्षेत्रासाठी 1 लाख 75 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येईल. तरी या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे. अधिक माहितीसाठी मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर यांनी कळवले आहे.