नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : माझगाव डॉकच्या सामाजिक दायित्व निधीतून जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी 5 रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. या रुग्णवाहिका जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड आणि माझगाव डॉकच्या सामाजिक दायित्व निधीचे उपव्यवस्थापक रोहीत पांन्ड्या यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्या.

            यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, अतिरिक्त जिल्हा नियोजन अधिकारी राहुल पवार आदी उपस्थित होते.

            यावेळी बोलताना डॉ.भारुड म्हणाले, आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील आरोग्यसुविधा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सामाजिक दायित्व निधीतून यापूर्वी 11 रुग्णवाहिका देण्यात आल्या असून या 5 रुग्णवाहिकांमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना चांगली सेवा देता येईल. दुर्गम भागातील तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनाही चांगले वाहन देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

            नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सेवेसाठी माझगाव डॉकतर्फे  यापुढे देखील सहकार्य करण्यात येईल, असे श्री. पांन्ड्या यांनी यावेळी सांगितले.

            आज प्राप्त झालेल्या 5 रुग्णवाहिकांसाठी माझगाव डॉककडून 52 लाख 50 हजाराचा निधी प्राप्त झाला होता. यापूर्वी 1 कोटी 24 लाख खर्च करून  11 रुग्णवाहिका घेण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिकांमुळे रुग्णांची वाहतूक करण्यास मदत होणार आहे. दोन शववाहिन्यादेखील मंजूर करण्यात आल्या असून त्या येत्या काळात प्राप्त होणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.