नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ‘कोविड- 19’ मुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या जवळच्या नातेवाईकांना राज्य शासनातर्फे 50 हजार रुपयांचे सानुग्रह साहाय्य करण्यात येणार आहे. त्यासाठी विकसित केलेल्या पोर्टलवर संबंधितांच्या नातेवाईकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यातील काही अर्ज विविध कारणामुळे नामंजूर झाले असल्यास अशा प्रकरणासंदर्भात नातेवाईकानी अपील करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.

कोविड-19’ मुळे मृत झालेल्या रुग्णांच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य वितरीत करण्याबाबत mahacovid19relief.in या पोर्टलवर सानुग्रह साहाय्य प्राप्त होण्याकामी ऑनालाईन अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यातील काही अर्ज विविध कारणांमुळे नामंजूर झाले असल्यास अशा सर्व प्रकरणांबाबत अर्जदाराची सानुग्रह साहाय्य मिळण्याची संधी कायम राहील. मात्र, त्यासाठी पुढील कार्यवाही करण्यासाठी शासनाकडून निर्देश प्राप्त आहेत.

यापूर्वी ऑनलाईन केलेले अर्ज काही कारणामुळे नामंजूर झाले असल्यास, अशा अर्जाबाबत पुढील कार्यवाही करीता अर्जदाराने शासनाच्या mahacovid19relief.in या संकेतस्थळावर भेट दिल्यास अर्जदारास Appeal to GRC अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारास त्याचा यापूर्वीच भरलेला अर्ज योग्य आणि विश्वसनीय आहे. असे वाटत असल्यास प्रकरणाच्या फेरतपासणीकरीता अर्जदाराने संकेतस्थळावरील Appeal to GRC या संदेशावर क्लिक करुन GRC (तक्रार निवारण समिती) कडे अपील करावे. Appeal to GRC यावर क्लिक केल्यानंतर लागलीच निवेदन ऑनलाईन तक्रार निवारण समितीकडे सादर झाल्याचा संदेश पोर्टलवर दिसेल.

सदस्य सचिव तथा जिल्हा शल्यचिकित्सक, नंदुरबार तक्रार निवारण समितीकडे असे प्राप्त अपील प्रकरणे समक्ष सुनावणीसाठी संधी दिली जाईल. याबाबत अर्ज करताना पोर्टलवर नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश प्राप्त होईल. या संदेशात तक्रार निवारण समितीकडे समक्ष उपस्थित राहावयाची तारीख, वेळ व स्थळ नमूद असेल. त्यावेळी अर्जदारांना आवश्यक ती सर्व मूळ कागदपत्रांसह तक्रार निवारण समितीकडे समक्ष, सोबत, जबाबदार प्रतिनिधींनी उपस्थित राहावे. 

तक्रार निवारण समिती अर्जदाराचा अर्ज क्रमांक Scrutiny Tab  मधून शोधून अपलोड केलेल्या व अर्जदाराने सोबत आणलेल्या मूळ सर्व कागदपत्रांची तपासणी करुन  पुढील अर्ज  मंजूर करणे अथवा नामंजूर करण्याचा योग्य तो निर्णय घेतील. तक्रार निवारण समितीद्वारे तपासणी अंती मंजूर केलेले सर्व अर्ज अंतिम मंजुरीकरीता जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पाठविले जातील.

अर्जदाराच्या खात्यावर पैसे पाठविण्याची पुढील कार्यवाही शासन स्तरावर करण्यात येईल. या सर्व बाबत अर्जदारास त्याच्या अर्ज पोर्टलवर आणि त्यांने नोंदविलेल्या मोबाईल कमांकावर संदेश प्राप्त होतील. कोणत्याही अर्जदारांनी  लेखी अर्ज  करु नये. अशा प्राप्त अर्जावर कोणतीही कार्यवाही होणार नाही. खोटी कागदपत्रे तयार करणे, चुकीची, दिशाभूल करणारी माहिती देणे, दुबार सानुग्रह अनुदानासाठी प्रयत्न करणे ह्या बाबी फौजदारी स्वरूपाच्या असल्याने त्या दंडनीय असल्याने, असा प्रयत्न करणारा व्यक्ती विरुद्ध भारतीय दंड संहिता अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी म्हटले आहे.