नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीची बैठक खासदार डॉ.हिना गावीत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.

            यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, तळोदा नगर पालिकेचे नगराध्यक्ष अजय परदेशी, शहादा नगर पालिकेचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव आदी उपस्थित होते.

            यावेळी रस्ता सुरक्षा विषयक बाबींचा आढावा घेण्यात आला. खासदार डॉ.गावीत म्हणाल्या, वाहतूक सुरक्षा विषयक आराखडा तयार करून सादर करावा. नेहमी अपघात होत असलेल्या रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात यावे. रस्त्यावरील ब्लॅकस्पॉटबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. ग्रामीण भागात गाडीच्या टपावर प्रवाशांना बसवून वाहतूक होणार नाही याची दक्षता घ्यावी, त्यासाठी विशेष तपासणी मोहिम राबवावी. महामार्गावरील मोठे खड्डे बुजवण्याचे काम तातडीने करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

            बैठकीत वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण, वाहनांची तपासणी व नोंदणी, अपघातांच्या कारणांचे विश्लेषण, वाहतूक सुरक्षा‍विषयक शाळेतून जनजागृती करणे, ट्रॅफीक पार्कची उभारणी आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

            श्री.बच्छाव यांनी सादरीकरणाद्वारे रस्ता सुरक्षा विषयक करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. जिल्ह्यात 2 लाख 15 हजार 787 वाहने आहेत. गतवर्षी 10 लाखाच्यावर वाहनांची तपासणी करून 72 हजार 829 वाहनांकडून 27 कोटी 97 लाख रुपये तडजोड शुल्क आणि 5 कोटी 47 लक्ष रुपये थकीत वाहन कर वसूल करण्यात आले. रस्ता सुरक्षा समितीकडे प्राप्त 148 प्राणांतिक व गंभीर जखमी अपघातापैकी 76 मानवी चुकांमुळे झाले. गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी अपघातांची संख्या कमी झाले आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

            बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.