नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2021 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2021 आहे.

प्रतिकूल हवामान घटकांपासून पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पीक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान या जोखीम बाबींचा प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2021 करिता समोवश करण्यात आला आहे.

 काढणी पश्चात नुकसान स्थानिक आपत्ती या जोखिमेअंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्व्हे क्रमांकानुसार बाधित पिक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत क्रॉप इन्शुरन्स ॲप, संबंधित विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक, बँक, किंवा कृषि अथवा महसूल विभागाला कळवावे. नुकसान कळवितांना सर्व्हे क्रमांक व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक आहे.

ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक राहील. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी मुदतीपुर्वी नजीकचे बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्याचा न होण्याचा पर्याय उपलब्ध असून योजनेत सहभाग नोंदविण्यास इच्छुक नसेल तर तसे घोषणापत्र योजनेतील सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदरपर्यंत देणे आवश्यक आहे.  जे शेतकरी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांचा विमा हप्ता कपात करुन योजनेत सहभागी करुन घेण्याबाबत बँकेमार्फत कार्यवाही केली जाईल.

योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विमा कंपनी शेतकरी विमा हप्ता आणि केंद्र व राजय शासनाकडून विमा अनुदानाचा पहिला हप्ता प्राप्त झाल्यानंतर पिक पेरणी/लावणीपूर्व नुकसान भरपाई/हंगामामध्ये प्रतिकुल परिस्थितीमुळे झालेले नुकसान/स्थानिक आपत्ती या जोखमींच्या बाबींकरीता नुकसान भरपाईची पुर्तता करतील.  त्याचप्रमाणे उत्पन्नाच्या आकडेवारीवर आधारीत व काढणी पश्चात नुकसान या जोखिमीच्या बाबींकरीता नुकसान भरपाईची पुर्तता केंद्र व राज्य शासनाकडून विमा अनुदान अंतिम हप्ता प्राप्त झाल्यानंतर करतील.

विमा योजनेअंतर्गत विविध जोखिमींअतर्गत निश्चित होणारे नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेच्या अटी व शर्तींच्या अधिन राहून निश्चित केले जाते.  हंगामात घेण्यात आलेली पिक कापणी प्रयोगातून प्राप्त होणाऱ्या सरासरी उत्पन्नाची तुलना ही उंबरठा उत्पन्नाशी करुन हंगामाच्या शेवटी नुकसान भरपाई निश्चित करण्यात येईल.

नंदुरबार जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं. लि. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, 5 वा मजला, चिंतामणी अव्हेन्यू, विरानी औद्योगिक वसाहती जवळ, गोरेगांव (इ) मुंबई-400063 (दूरध्वनी क्र. 022-68623005 टोल फ्री क्रमांक 18001024088) ही विमा कंपनी नियुक्त करण्यात आली आहे.

या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2021 ही असून योजनेत सहभागी होण्यासाठी जवळच्या जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी अथवा आपले सरकार सेवा केंद्र यांच्याशी संपर्क साधावा.