नंदुरबार :- जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एका समाजसेवी विचाराच्या दाम्पत्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजातील गरजवंतांसाठी उच्च प्रतीचे तब्बल एक हजार मास्क तयार करण्याचा संकल्प केलाय. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक भूषण चव्हाण व त्यांच्या पत्नी सौ. स्वाती चव्हाण यांनी संकल्प पुर्तीला सुरुवात केली असून, शहादा उपविभागीय पोलीस उपअधीक्षक श्री पुंडलिक सपकाळे यांना १०० मास्क देऊन या उपक्रमाला सुरुवात केली.

     जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील जसोदानगर येथील रहिवासी सौ. स्वाती भूषण चव्हाण यांनी जगभरात  झपाट्याने वाढत असलेल्या कोविड 19 सारख्या महाभयंकर आजाराच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षक पती भूषण चव्हाण यांच्या प्रोत्साहनाने स्वनिर्मित 1000 मास्क मोफत वितरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याचा शुभारंभ करत शहादा येथील उपविभागिय पोलीस उपअधीक्षक श्री.पुंडलीक सपकाळे यांच्या गस्त दरम्यांन  रस्त्यावर आढळणाऱ्या गरीब व गरजू लोकांना मोफत वितरण करण्यासाठी 100 मास्क भेट देण्यात आले. हे मास्क सौ स्वाती भूषण चव्हाण यांनी घरीच बनविले आहेत. त्यासाठी उत्कृष्ट दर्जाचे कापड व इलास्टिक घेऊन त्याची कटिंग  श्रीमती मानिषा यांच्याकडून करून घेण्यात आली व सौ. चव्हाण यांनी स्वतः शिऊन घेतले. तयार करण्यात आलेले मास्क डिटर्जंटच्या पाण्यात धुऊन उन्हात वाळवले. त्यानंतर सर्व मास्कला इस्त्री करून निर्जंतुकीकरणासाठी त्यावर सेनेटराईजर स्प्रे केले आहेत.

     कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मास्क वापरणे प्रत्येकाला आवश्यक आहे,  त्यासाठी पोलिस उप अधिक्षक श्री. पुंडलीक सपकाळे हे गरजूंना नेहमी स्वतः मास्क वाटप करत असतांना व मास्क वापराचे महत्त्व पटवून देत असतानाचे व्हिडिओ व अनेक बातम्या दिसत होत्या,  त्या प्रेरणेतून या सेवेत आपलाही खारीचा वाटा असावा, या भावनेतून शहादा तालुक्यातील कु-हावद जि. प. शाळेतील शिक्षक श्री भुषण प्रताप चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी तब्बल 1000 मास्क निर्मिती करून समाजातील गरजू व गरीब लोकांना सामाजिक ऋण म्हणून वाटायचे ठरविले आहे. आठवडाभरात हे 1000 मास्क विविध ठिकाणी वितरित करण्यात येणार आहेत.

त्यांच्या या कार्याची दाखल घेत पोलीस उपाधिक्षक श्री सपकाळे यांनी सौ. स्वाती चव्हाण यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.