नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे  आणि ‘कोरोनामुक्त व लसीकरणयुक्त गाव’ मोहिम राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.

दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, उपविभागीय अधिकारी शाहूराज मोरे, चेतन गिरासे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आदी उपस्थित होते.

डॉ.भारुड म्हणाले, 45 वर्षावरील सर्व व्यक्तींचे लसीकरण झालेल्या कोरोनामुक्त गावांचा सत्कार करण्यात येईल. तहसिलदार आणि गट विकास अधिकारी यांनी कोरोना लसीकरणासाठी पात्र व्यक्तींच्या यादीनुसार लसीकरण झालेल्यांची माहिती घ्यावी. लसीकरण कमी झालेल्या भागात शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. 10 हजार व्यक्तींच्या लसीकरणाचे उद्दीष्ट ठेवून नियोजन करण्यात यावे.

लसीकरणाचे प्रमाण अधिक असलेल्या गावातील अनुभव लक्षात घेऊन त्यानुसार इतर ठिकाणी नियोजन करावे. लसीकरण  अत्यंत कमी असलेल्या गावात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी बैठका घेऊन नागरिकांना माहिती देण्यात यावी. काही भागात लसीकरणासाठी गाव आणि पाड्यापर्यंत पोहोचावे. अक्कलकुवा, नवापूर, तळोदा आणि धडगाव तालुक्यच्या ग्रामीण भागात लसीकरण केंद्राची माहिती देणारे फलक लावावेत.

आरटीपीसीआर चाचण्यांचे स्वॅब संकलन झाल्यानंतर त्वरीत चाचणीसाठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठविण्यात यावेत. बाजारातील व्यावसायिक, फळ व भाजीविक्रेते यांची मोहिम स्तरावर रॅपीड अँटीजन चाचणी करण्यात यावी. कोरोना बाधितांचे प्रमाण 10 टक्क्यापेक्षा कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे.  नवापूर शहरात दुपारनंतर सुरू राहणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात यावी. प्रकाशाप्रमाणे इतरही गावातून कोरोना घालविण्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रयत्न करावे, असे त्यांनी सांगितले.

तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी समन्वयाने लसीकरण आणि स्वॅब संकलनाला गती द्यावी. कोरोना बाधितांचे प्रमाण अधिक कमी करण्यासाठी प्रयत्न करावे, असे श्री.गावडे यांनी सांगितले.

बैठकीस सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते.

नंदुरबार तालुक्यात कोरोना लसीकरण शिबीराचे आयोजन

नंदुरबार तालुक्यातील राजापूर , नांदरखेडा, घोटाणे, ढंडाणे, उमज, समशेरपुर, खामगाव, गुजर जांबोली व शितलपाडा या गावांमध्ये मंगळवार 11 मे 2021 रोजी कोरोना लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.  शिबीरात 45 वर्षावरील सर्व ग्रामस्थांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी  डॉ.जे.आर.तडवी यांनी केले आहे.