नंदुरबार : करोनामुळे अनेक मजुंराचा रोजगार गेला असून अनेक मजूर हे जिल्ह्यात आपल्या मूळगावी परतल्याने त्यांच्यासमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या सर्वांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून कामे उपलब्ध करुन देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत दिले. बैठकीस सहायक जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा, तृप्ती धोडमिसे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुधीर खांदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी.एन.पाटील, कृषी उपसंचालक एम.एस.रामोळे उपस्थित होते.

डॉ.भारुड म्हणाले, मनरेगातून जिल्ह्यात 5 हजार 144 कामे सुरु असुन 41 हजार 157 मजूराना कामे उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या संख्येत अधिक वाढ करण्याचा प्रयत्न सर्व यंत्रणांनी करावा. जिल्ह्यातुन 75 हजार मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट असून त्यादृष्टीने प्रलंबित असलेली कामे त्वरीत सुरु करण्यात यावीत. सध्या शेतीमजूरीची कामे ठप्प कमी असल्यामुळे मनरेगा अंतर्गत कृषी विभागाने प्रत्येक तालुकास 5 हजार या प्रमाणे 30 हजार मजूराना कामे उपलब्ध करुन द्यावीत. एका कृषि सहायकास 5 कामे, कृषि पर्यवेक्षक 10, कृषि अधिकाऱ्याने किमान 15 कामे करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
पावसाळ्यात मनरेगाची इतर कामे होत नसल्याने फळबाग लागवडीची 100 टक्के कामे केल्यास
फळबागाच्या कामातुन 30 ते 35 हजार मजूराना रोजगार उपलब्ध करुन देणे शक्य होईल. त्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी काळजी घेण्यात यावी. मनरेगाच्या कामाच्या ठिकाणी सॅनिटायझर, हँडवॉश, साबण, पेपर सोप उपलब्ध करून देण्यात यावे. मजुरांना स्थानिक आरोग्य केंद्राकडून आरोग्य सुविधा उपलब्ध करुन द्यावी आणि लक्षणे आढळल्यास लगेचच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन द्यावीत. काम करतांना पुरेसे अंतर ठेवून काम पूर्ण होईल याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबधीत अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यात बोगस बी – बियाणे तसेच जादा दराने खताची विक्री होत असल्यास संबधित दुकानावर तातडीने कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. मनरेगाअंतर्गत कामाची मागणी करण्याचे नागरीकांना आवाहन

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार प्रत्येक मजूराला किमान 238 रुपये मजूरी दिवसाला मिळते. तर कामाच्या स्वरुपानुसार या मजुरीमध्ये वाढ देखील होते. मस्टर संपल्यानंतर आठ दिवसाच्या आत 100 टक्के मजूरांच्या खात्यावर मजूरीची रक्कम थेट जमा करण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागातील जास्तीत जास्त मजूरांनी कामाची मागणी करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याबैठकीस कृषी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.