नंदुरबार (प्रतिनिधी) – प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील सदस्यांना मोफत तांदूळ वितरण करताना नियमांचे पालन  न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन  जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात रास्त भाव दुकानदार संघटनांचे प्रतिनिधी, गॅस एजन्सी संचालक, केरोसीन अर्धघाऊक विक्रेत्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सहायक जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा, वसुमना पंत, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्ह्यातील तहसीलदार आदी उपस्थित होते.

बैठकीत धान्य वाटपाचा आढावा घेण्यात आला.डॉ.भारुड म्हणाले, केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत तांदूळ उपलब्ध करून दिल्याने लाभार्थ्यांना एप्रिल, मे आणि जून 2020 साठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत दिलेल्या अन्नधान्याचे त्या-त्या महिन्यात वाटप होईल. रास्त भाव दुकानदारांनी वाजवीपेक्षा जास्त दर आकारणी करू नये.

एप्रिलमध्ये अंत्येादय  व प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना नियमित नियतन वाटप होईल. ई-पॉस मशिनवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या मोफत तांदळाचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात यावे. लाभार्थ्यांनी नियमित अन्नधान्याची उचल केल्याची खातरजमा करून नंतरच मोफत धान्य द्यावे. मोफत वितरण केलेल्या  धान्याची पावती दुकानदारांनी सांभाळून ठेवावी, असे त्यांनी सांगितले.

उज्वला गॅस येाजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत सिलेंडर देण्याबाबतही यावेळी सूचना देण्यात आल्या. केरोसिन दुकानदारांनी केरोसिन वाटप करताना फोटा किंवा व्हिडीओद्वारे नांद ठेवावी व केवळ पात्र लाभार्थ्यांनाच केरोसिन मिळेल याची दक्षता घ्यावी, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.