नंदुरबार : शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, सहकारी  संस्था स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी आस्थापना (25 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असणारी )  यांनी रिक्तपदे भरतांना कौशल्य विकास विभागाच्या www.mahaswayam.gov.in   संकेतस्थळावर रिक्तपदे अधिसूचित करणे बंधनकारक असून पात्र उमेदवारांच्या याद्या डाऊनलोड करुन सदर यादी व जाहिरातीनुसार आलेले अर्ज यामधून पात्र उमेदवारांची विहित पद्धतीनुसार निवड करण्यांत यावी, असे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रा. म. कोल्हे यांनी कळविले आहे.

अनेक शासकीय, निमशासकीय कार्यलये, महामंडळे, सरकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, आणि खाजगी आस्थापना (25 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असणारी ) त्यांच्याकडील रिक्तपदे केवळ वृत्तपत्रात जाहीरात प्रसिद्ध करून थेट नियुक्तीद्वारे भरीत आहेत.  याबाबत स्थानिक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुर्वीचे सेवायोजन कार्यालये यांना कोणतीही सुचना न देता कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे.  त्यामुळे सेवायोजन कार्यालये रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणारा अधिनियम 1959 व सर्वेाच्च न्यायालयाने दिलेले आदेश यांचे अधिन राहून सर्व आस्थापनांनी रिक्तपदे भरण्याची कार्यवाही करावी. रिक्तपदे भरतांना कायद्याचे उल्लंघन केल्यास अधिनियमातील तरतुदीनुसार कार्यवाही केली जाईल, असेही श्री. कोल्हे यांनी कळविले आहे.